*• बांधकामाच्या ठिकाणी कीटकनाशक नियंत्रणासाठी व्यवस्था तयार करावी*
*• रस्त्यांलगतची दुकाने आणि खाऊगल्लींमध्ये निर्माण होणाऱ्या खाद्यान्नाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना*
*• शहर विभागातील फोर्ट परिसर, स. का. पाटील उद्यान, नाना चौक परिसर आणि वरळी येथील उदंचन केंद्रास पहाटे भेट देऊन केली पाहणी*
नागरिकांकडून विविध नागरी सुविधा किंवा समस्यांबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारी या प्रशासनासाठी कान व डोळ्यासारख्या असतात. त्यातून प्रशासनाला प्रतिसाद (रेडी फिडबॅक) मिळत असतो. त्यामुळे, नागरिकांच्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन त्यांचे वेळीच निराकरण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच, विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘मार्ग’ (मॅनेजमेंट एंड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) अॅप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करावा. बांधकामाच्या ठिकाणी कीटकनाशक नियंत्रणासाठी व्यवस्था तयार करावी. रस्त्यांलगतची दुकाने आणि खाऊगल्लींमध्ये निर्माण होणाऱ्या खाद्यान्नाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे दिले आहेत.
अश्विनी भिडे यांनी बुधवार दि.२० मे रोजी पहाटेच्या सुमारास फोर्ट परिसरातील ७४- मिंट मार्गावरील कीटकनाशक नियंत्रण चौकी येथे भेट दिली. ही मुंबईतील सर्वात पहिली आणि सुमारे १०० वर्षे जुनी कीटकनाशक नियंत्रण चौकी आहे. त्यानंतर, त्यांनी ‘ए’ विभागातील ए-२ रस्ते दुरुस्ती व भांडार चौकी आणि मलनिस्सारण चौकी; ‘सी’ विभागातील कमळाबाई कन्या शाळा मार्गावरील स. का. पाटील उद्यानातील रस्ते दुरुस्ती व भांडार चौकी, विद्यार्थी अभ्यासिका; ‘डी’ विभागातील नाना चौक परिसर, कीटकनाशक चौकी तसेच ‘जी दक्षिण’ विभागातील वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, कीटकनाशक नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. रस्त्यांलगतची दुकाने आणि खाऊगल्लींमध्ये खाद्यान्नांचा कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. त्यामुळे, उंदीर, मांजर आणि डासांचाही उपद्रव वाढतो. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या खाद्यान्नाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपाहारगृह आणि खाद्यान्न विक्री करणाऱ्या आस्थापनांनी खाद्यान्नांचा कचरा इतरत्र न फेकता तो बॅगमध्ये भरून महानगरपालिकेच्या कचरा संकलकांकडे सुपूर्द करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे. तसेच, डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिक किंवा विकासकाकडून बांधकामांच्या ठिकाणी यंत्रणा तयार करणे आणि कर्मचारी नेमणूक करण्यासाठी सूचित करावे, अशा सूचनाही भिडे यांनी यावेळी दिल्या.
भिडे पुढे म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून मदतसेवा क्रमांक, समाजमाध्यमे आदी माध्यमांतून विविध नागरी सुविधा किंवा समस्यांबाबत तक्रारी, अभिप्राय येत असतात. या तक्रारी किंवा अभिप्राय प्रशासनासाठी कान व डोळ्यासारख्या असतात. त्यातून प्रशासनाला वास्तविक प्रतिसाद (रेडी फिडबॅक) मिळतो. या तक्रारी किंवा अभिप्रायांची गांभिर्याने दखल घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करावे. तसेच, मदतसेवा क्रमांक, समाजमाध्यमे आदी विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने ‘मार्ग’ (मॅनेजमेंट एंड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) हे एकत्रित आणि समर्पित अॅप्लिकेशन सुरू केले आहे. सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे वापर करावा. तसेच, आपल्या दैनंदिन कामकाजात स्वतः सक्रियता दाखवून अधिक उत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पावसाळ्याच्या पूर्वी उदंचन केंद्रातील यंत्रणा सुसज्ज ठेवावी. पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणी उपसा संच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असेही श
भिडे यांनी निर्देशित केले.
दरम्यान, श्रीमती भिडे यांनी यावेळी कीटकनाशक नियंत्रणासाठी वापरली जाणारी विविध उपकरणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक पाहून संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, मूषक नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, चौकीवरील एकंदरीत कामकाज आदींबाबत सखोल माहिती घेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंदवही आणि अन्य बाबींची पडताळणी केली.
उपायुक्त (परिमंडळ १)
चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ प्रशांत सपकाळे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (सी विभाग) अलका ससाणे, सहायक आयुक्त (ए विभाग) गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त (डी विभाग) संतोष साळुंके, संबंधित अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, कीटकनाशक, स्वच्छता, परिरक्षण आदी विभागातील कर्मचारी, कामगार तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या भिडे यांनी जाणून घेतल्या. स. का. पाटील उद्यानात आलेल्या नागरिकांशी आणि अभ्यासिकेत असलेल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. तसेच, डी विभागातील कीटकनाशक चौकीवर कार्यरत असलेले आणि आपली कर्तव्ये बजावून विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवणारे कर्मचारी आणि कामगारांचेही त्यांनी कौतूक केले.
***



















