Home मुंबई *धारावीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या ९०% स्थानिकांना ‘अपात्र’ ठरवून बेघर करण्याचे मोठे षडयंत्र, सरकारच्या...

*धारावीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या ९०% स्थानिकांना ‘अपात्र’ ठरवून बेघर करण्याचे मोठे षडयंत्र, सरकारच्या सर्व यंत्रणा अदानीसाठी – खा. वर्षा गायकवाड.*

13
0

*धारावीकरांना विश्वासात घेतल्याशिवाय एक वीटही हलू देणार नाही, धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करा, घराच्या बदल्यात घर तर दुकानाच्या बदल्यात दुकान द्या.*

*धारावीतील लघु उद्योग, धार्मिक स्थळांचे पुनर्वसन त्याच जागी करा, कोळीवाड्यांचे सिमांकन करण्यात यावे.*

मुंबई, दि. ४ मे ..

मोदींचे मित्र अदानीसाठी भाजपा सरकार धारावीकरांना बेघर करत असून स्थानिकांना घरे कुठे मिळणार हे सांगितले जात नाही. पोलीस, गुंड, दलाल व सरकारी यंत्रणाच्या मदतीने स्थानिकांना धमकावले जात आहे. धारावीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या ९० टक्के स्थानिकांना अपात्र ठरवून बेघर करण्याचे मोठे षडयंत्र असून सरकारच्या सर्व यंत्रणा अदानीसाठी काम करत आहेत. परंतु धारावीकरांना विश्वासात घेतल्याशिवाय एक वीटही हलू देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

धारावीत आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, शिवसेनेचे (UBT) खासदार अनिल देसाई, काँग्रेसच्या धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड, शिवसेना (UBT) आमदार महेश सावंत, माजी आमदार बाबूराव माने, काँग्रेस, शिवसेना (UBT) चे नगरसेवक व हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजपा सरकारला जनतेचा आक्रोश ऐकू येत नाही, त्यांना फक्त अदानीचा आवाज ऐकू येतो व अदानीचाच फायदा दिसतो. धारावीची परिस्थिती अत्यंत भयावह आहे, धारावीकरांना अंधारात ठेवले जात आहे. महापालिका अधिकारी माहिती देत नाहीत, चर्चा करायला तयार नाहीत, धारावीकरांना नक्की घर कुठे मिळणार? दुकान कुठे मिळणार? हे सांगितले जात नाही. पुराव्यांची कागदपत्रे असतानाही लोकांना अपात्र करणे हा अन्याय आहे, हा लढा केवळ घरासाठी नाही, तर आमच्या अस्तित्वासाठी आहे. धारावीत मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आहेत, त्यांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. धार्मिक स्थळांचे पुनर्वसन, कोळीवाड्यांचे सिमांकन करण्यात यावे व शाहु नगर सारख्या मोठ्या वसाहती संदर्भातही लवकर निर्णय घेऊन त्यांचेही पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. अदानीसाठी धारावीतील आमची घरे आणि व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावू नका.

खासदार गायकवाड पुढे म्हणाल्या की, रेल्वे आणि महापालिकेच्या नावाखाली गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवले जात आहेत. बीकेसी जवळची आमची मोक्याची जमीन मोठे मॉल आणि पंचतारांकित हॉटेल्ससाठी हडपण्याचा हा डाव आहे पण ही जागा धारावीकरांच्या हक्काची आहे आणि ती धारावीकरच घेणार. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. धारावीकरांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या सरकार विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे व यापुढेही संविधानाच्या मार्गाने लढा देऊ, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here