Home मुंबई *नसरापूरचा काळा शुक्रवार – माणुसकीचा अंत की व्यवस्थेचा बळी?*

*नसरापूरचा काळा शुक्रवार – माणुसकीचा अंत की व्यवस्थेचा बळी?*

10
0

*महाराष्ट्राच्या लेकराचे आपण गुन्हेगार!*

अग्रलेख: शीतल हरीश करदेकर

नसरापूरच्या राम मंदिराच्या पायरीवरून खेळणारी ती ४ वर्षांची चिमुकली! शुक्रवारी दुपारी ३ वाजता दिसेनाशी झाली आणि ३ तासांनंतर संध्याकाळी ६ वाजता तिचा निष्प्राण देह शेणाच्या ढिगाऱ्यात सापडला.

या ३ तासांत ६५ वर्षांच्या सराईत नराधम, भीमराव कांबळे याने केवळ तिच्यावर अमानुष अत्याचारच केला नाही, तर महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेवर, कायद्याच्या धाकावर आणि आपल्या सामूहिक विवेकावरही निर्घृण बलात्कार केला.

हा केवळ खून नाही. तर एका विकृत मनोवृत्तीने, व्यवस्थेच्या बेपर्वाईने आणि समाजाच्या निष्क्रियतेने मिळून घडवलेला सामूहिक गुन्हा आहे.

*२२ तासांचा घटनाक्रम महाराष्ट्राच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा आहे.* मुलगी बेपत्ता झाल्यावर गावकऱ्यांनीच शोध सुरू केला. CCTV मध्ये आरोपी तिला नेताना दिसला. नंतर संतप्त जमावाने त्याला पकडले, तेव्हाच तो पोलिसांच्या हाती लागला. म्हणजे आरोपीला पकडण्यासाठीही लोकांना रस्त्यावर उतरावे लागते, हीच आपल्या पोलीस यंत्रणेची शोकांतिका आहे नाही का? रात्री ९ वाजता बंगळुरू हायवे रोखावा लागला, तेव्हा कुठे एसपी आंदोलनस्थळी आले. कोपर्डी बलात्कार घटनेतही लोकांनीच आरोपी पकडून दिले होते.

आमदारांना मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन लावता आला नाही, मंत्री तटकरेंना फोन करून आश्वासन द्यावे लागले. याचा अर्थ स्पष्ट आहे – अशा अती संवेदनशील प्रकरणातही ‘व्यवस्था’ गाढ झोपेचे सोंग घेऊन वावरत असते. तिला जागे करण्यासाठी ‘जनक्षोभाचा’ कर्कश नाद करावाच लागतो.

याने आधीही असेच गुन्हे केलेत. तरीही तो जामीन कसा मिळवू शकला? की तो निर्दोष कसा सुटला? पोलीसांनी माती भरपूर खाल्ली असेल ना?
आता परत अत्यंत सराईतपणे तेच गुन्हे तो करतो? समजते की स्वतःच्या घरच्या पुतणीला ही याने सोडले नाही.

*काय गुन्हा होता या ४ वर्षांच्या लेकराचा?* असे प्रसंग आमच्या लेकरांवर का यावेत? विकासाच्या दुनियेत भरारी घेताना, महिला आरक्षण, सक्षमीकरण, कायदे यात अडकलोय. आपण आपल्या या लेकीचे गुन्हेगार आहोत हे नक्की! या लेकराच्या जागी प्रत्येक मंत्र्याने, अधिकाऱ्यांनी आपली लेक पहावी, म्हणजे काळीज करपून निघेल!

*देवाभाऊ, ही आपली महाराष्ट्राची लेक.* नुकतंच अंकुर फुटून जग पाहू इच्छिणारी; तिला इतकी भयंकर दाहक शिक्षा का झाली? आमचं गृहखाते सैरभैर आणि गृहमंत्री सतत राजसत्ताकारणात ग्रस्त. काय शिस्त आहे आणि दरारा आहे गृहविभागाला? किती दूषणं द्यावी तितकी कमी आहेत!

*सर्वात धक्कादायक बाब ही आहे* की भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. याने यापूर्वी सख्ख्या पुतणीवरही अत्याचार केला होता. मग प्रश्न असा की, अशा विकृत, वासनांध नराधमाला जामीन मिळालाच कसा? त्याला कायद्याची भीती का वाटली नाही? कारण आपली न्यायव्यवस्था ‘तारीख पे तारीख’ मध्ये अडकली आहे. निर्भया प्रकरणानंतरही बलात्काराच्या केसेस वर्षानुवर्षे चालतात. आरोपी जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा तेच कृत्य करतात. नसरापूरची चिमुकली ही आपल्या कुचकामी व्यवस्थेचा आणि बेमुर्वत सरकारी यंत्रणेचा बळी आहे.

काल नसरापूर बंद झाले. गावकरी संतप्त आहेत. मोर्चे निघत आहेत. पण हे किती दिवस? उद्या आणखी एक घटना घडेल, आपण मेणबत्त्या पेटवू, हॅशटॅग ट्रेंड करू आणि विसरून जाऊ. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर आता ‘भावनिक आवाहना’पलीकडे जाऊन ‘कठोर कृती’ करावी लागेल.

*३० दिवसांत फाशी या नराधमाला देणे अत्यावश्यक आहे.* प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून एका महिन्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे. ही ‘टेस्ट केस’ ठरली पाहिजे. असा जबरदस्त दरारा, धाक बसावा की कुणीही असले प्रकार करण्याचा विचारही करणार नाही.

*सराईत बलात्काऱ्याला जामीन कोणी आणि कसा दिला?* याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. साधं पहा, ‘बाल हक्क आयोगा’ला इतका आक्रोश होऊनही कल्पना नाही. महिला बाल कल्याण मंत्री यांची ही जबाबदारी आहे की नाही? इतका प्रकार घडूनही ‘बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन यांचा कार्यकाळ संपलाय, महिला आयोग वाऱ्यावर आहे. कसलं हे सरकार देवा आपलं?

या सर्व महिला व बाल विकास हक्क विषयाची जबाबदारी असणाऱ्या विभागांच्या सक्षमीकरणाची गरज आहे. राजकारण करणाऱ्या बायका अशा वेळी गप्प बसतात तेव्हा त्यांचे मुखवटे फाटतात! का अशा विषयावर अळीमिळी गुपचूप आहेत? अशा विभाग-मंडळावर सक्षम व संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे. का या ग्रामस्थांना पुणे-बंगलोर हायवे रस्तारोको करावा लागतोय? जीव गेल्यावरही या लेकराचं शव ॲम्ब्युलन्समध्ये पडून राहिलं! का इतकी मानसिक क्रूरता? यावर तत्काळ कृती व खुलासा व्हायला हवा.

*सेक्स ऑफेंडर्स रजिस्टर सार्वजनिक करणे आवश्यक आहे.* गल्लीबोळात लपलेले भीमराव कांबळे कोण आहेत, हे प्रत्येक पालकाला कळले पाहिजे. त्यांचे फोटो, पत्ते सार्वजनिक करायला हवेत.

*पोलिसांची जबाबदारी निश्चित करायला हवी.* सरकारचं नियंत्रण या विभागावर नाही की गृहमंत्र्यांचं कोणीही अधिकारी ऐकत नाहीत? तक्रार आल्यावर तत्काळ कारवाई न करणाऱ्या, आरोपीला पकडण्यासाठी जनतेवर विसंबून राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायला हवी.

नसरापूरची ही चिमुकली आता परत येणार नाही. तिच्या आजीचा आक्रोश, तिच्या आई-बापाची किंकाळी आपल्याला ऐकू येत नसेल, तर आपण माणूस म्हणून संपलो आहोत हे लक्षात ठेवा!

हा अग्रलेख लिहिताना हात थरथरतो आहे, पण मनात एकच निर्धार आहे – भीमराव कांबळेला फाशी झाल्याशिवाय हा संताप शांत होणार नाही. कारण हा प्रश्न फक्त नसरापूरचा नाही. हा प्रश्न आहे आपल्या लेकी सुरक्षित आहेत का, याचा. हा प्रश्न आहे आपण ‘महाराष्ट्र’ म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत का, याचा!
*आणि म्हणूनच मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. गुन्हेगाराला फाशी द्या, चौकशी काटेकोरपणे व्हावी, कुटुंबाला आधार द्यावा. गुन्हेगाराला फाशी होईपर्यंत आम्ही अर्थात मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया, सर्व माध्यमकर्मी गप्प बसणार नाही. आमचा लढा आपल्या त्या लेकरासाठी, तिच्या कुटुंबासाठी आहे.

एक मात्र आहे की या विषयावर राजकारण होता कामा नये. पण शेवटी प्रचंड वेदनेने म्हणावे लागेल की, *त्या चिमुकलीला न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्राला महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही.* आपल्या या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here