Home मुंबई मुंबईच्या पवई व चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’

मुंबईच्या पवई व चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’

10
0

गैरप्रवृत्तींवर कडक कारवाईसाठी विशेष मोहीम राबवा – मंत्री शंभूराजे देसाई

मुंबई
“मुंबईच्या पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन व गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करावी तसेच पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी.” असे स्पष्ट निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये विधानसभा लक्षवेधी क्र. २१६२ संदर्भात मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज विशेष बैठक पार पडली.
विधिमंडळ अधिवेशना- दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभारी मंत्री म्हणून गृहनिर्माण विभागाची अतिरिक्त जबाबदारी दिल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी मंत्री देसाई यांनी संवेदनशील उद्यान परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने माजी सैनिक सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी नागरिकांना अधिक त्रास होत आहे, त्या ठिकाणांपासून ही कार्यवाही प्राधान्याने सुरू करण्यावर भर देण्यात आला.अंमली पदार्थ सेवन आणि समाजविघातक हालचालींना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस प्रशासनाने मिशन मोडमध्ये विशेष मोहीम राबवावी, संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे अंमलात आणाव्यात. “सार्वजनिक उद्यानांचा गैरवापर करू नये नागरिकांच्या सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीविरोधात प्रशासन ठामपणे उभे राहील,” असे ठाम मत मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.
या बैठकीस आमदार दिलीप लांडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त अजितकुमार आंबी, मुंबई पोलीस झोन १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे तसेच पवई–चांदिवली परिसरातील स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here