Home मुंबई *जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार*

*जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार*

16
0

*महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे उद्गार*

*महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची निवड*

*महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक अंधेरीत संपन्न*

मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनसेवा सुरू झाली आहे. अशा स्थितीत जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व महापौरांवर अधिक जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून शासनाशी समन्वय साधण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक मुंबईत अंधेरी (पश्चिम) येथे महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि. २६ एप्रिल २०२६) रोजी संपन्न झाली. त्यावेळी संबोधित करताना त्या बोलत होत्या.

या परिषदेचे आयोजन अंधेरी (पश्चिम) येथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिकराज भवन या वास्तूमधील सभागृहात करण्यात आले.

या बैठकीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, वसई-विरारचे महापौर अजीव पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी – थवील, भिवंडी-निजामपूरचे महापौर नारायण चौधरी, धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, जालना शहराच्या महापौर वंदना मगरे, परभणीचे महापौर श्री. सय्यद इकबाल, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे आदी महापौर उपस्थित होते.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, संयोजक लक्ष्मणराव लटके, कार्यालयीन सचिव निधी लोके हे देखील यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी, परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यांनी उपस्थित सर्व महापौरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष मुंबईचे महापौर असतात. तर उपाध्यक्षांची निवड केली जाते. त्यानुसार पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पद निवड ही एक वर्ष कालावधीसाठी असते.

उपाध्यक्ष निवडीनंतर मार्गदर्शन करताना, अध्यक्षीय भाषणात रितू तावडे म्हणाल्या की, “अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतकी महोत्सवी वर्षात मला महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आणि सर्व महापौरांना सदस्य पदाचा मान मिळाला, हा एक प्रकारचा आपला गौरव आहे. सुमारे चार वर्षांनंतर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या रूपाने राज्यातील महापौरांना देखील आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सर्व महापौरांचे प्रश्न, मागणी इत्यादी परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मांडणार आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक मुंबईत आयोजित करण्यात येईल. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या परिषदेचा लाभ होईल.”असे तावडे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्यातील महापौरांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी २०१२ मध्ये महाराष्ट्र महापौर परिषदेची स्थापना झाली. शंभर वर्षांपुर्वी म्हणजे सन १९२६ मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली. मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे तर देशात ५० ठिकाणी शाखा आहेत. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या राज्यात २०१२ पासून २२ बैठका झाल्या आणि १०१ ठराव मंजूर झाले. शासनाकडे पाठवलेले काही ठराव मंजूर झाले, तर शासनाकडे प्रलंबित ठराव मंजूर करण्याची जबाबदारी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून पार पाडण्यात येईल.” असे ते म्हणाले.

संस्थेचे मानद संचालक तथा परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी महापौरांचे कोणते अधिकार आहेत, कोणते ठराव प्रलंबित आहेत, यासह विविध विषयांची सविस्तर माहिती दिली.

तर, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या कार्यालयीन सचिव निधी लोके यांनी सर्व महापौरांशी आपसात समन्वय साधण्यासाठी संवाद यंत्रणा स्थापन करण्यात येईल. यापुढे अध्यक्षांच्या परवानगीने सातत्याने बैठक आयोजित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here