Home मुंबई *भाजपचे रोहिंग्या-बांगलादेशी कार्ड म्हणजे ‘द्वेषाचे राजकारण’*

*भाजपचे रोहिंग्या-बांगलादेशी कार्ड म्हणजे ‘द्वेषाचे राजकारण’*

26
0

*मुंबई आणि महाराष्ट्रात रोहिंग्या-बांगलादेशी वाढल्याची माहिती मुंबई पोलिस आणि केंद्रीय गृहखात्याकडे नाही.”- सचिन सावंत यांचा आरोप*

मुंबई, दि. २० : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि मुंबईत जाणीवपूर्वक धर्मांधतेचे आणि द्वेषाचे राजकारण करत आहे. मुंबईत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढल्याचा भाजपचा दावा पुर्णपणे तथ्यहीन असून तो केवळ राजकीय ध्रुवीकरणासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.

आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे वारंवार मुंबईत बांगलादेशींची संख्या वाढल्याचे सांगून लोकांमध्ये भीती पसरवत आहेत. मात्र, आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकारात आयबी, केंद्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्याकडे गेल्या ३ वर्षांत किती बांगलादेशी किंवा रोहिंग्या सापडले आणि किती जणांना परत पाठवले, याची अधिकृत आकडेवारी मागितली, तेव्हा या सर्व विभागांनी अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही,असे उत्तर दिले आहे. जर सरकारी दप्तरी नोंदच नाही, तर भाजप नेते कोणते आकडे सांगून मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

यूपीए सरकारच्या वर्ष २००४ ते २०१४ दरम्यान सुमारे ८७,००० बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आले. पण त्यानंतर आलेल्या
भाजप सरकारच्या काळात ही संख्या प्रचंड घटली आहे. वर्ष २०२१ मध्ये संपूर्ण देशातून केवळ २४१ वर्ष आणि २०२३-२४ मध्ये तर संपूर्ण देशातून केवळ ४११ घुसखोरांना परत पाठवण्यात आले. मग खरंच कुणाच्या काळात घुसखोरी झाली आणि कोणत्या सरकारच्या काळात यावर कारवाई झाली हे स्पष्ट आहे.
जर महाराष्ट्रात आणि मुंबईत खरोखरच आता घुसखोरी वाढली असेल, तर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. यासाठी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे.” असा टोला सचिन सावंत यांनी लगावला.

बांगलादेशी आणि रोहिंगे यांच्यावर कारवाई करत असल्याचे दाखवत
मालवणीमधील घरांवरील कारवाई करण्यात आली होती. त्याबाबत बोलताना सावंत म्हणाले की मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपचे इतर नेते हे केवळ ‘व्यापारी’ वृत्तीचे असून ते संवेदनशील नाहीत. केवळ द्वेषापोटी गरिबांची घरे पाडली गेली. ती घरेही हिंदू आणि दलित समाजाची होती. मुंबईच्या महापौर बांगलादेशी घुसखोरी काढणार अशा वल्गना करतात.महापालिकेचा पैसा हा राज्य व केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रश्नांवर का खर्च केला जावा? आणि या विषयावर मुंबई महापालिकेत बैठका का होत आहेत? आणि किरीट सोमय्यांचा पालिकेशी संबंध नसताना ते बैठकीत काय करतात असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला. तसेच जर जन्म प्रमाणपत्राच्या वाटपात घोटाळा होत असेल आणि फेरीवाले बांगलादेशी निघत असतील तर किती महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई झाली हे कळले पाहिजे असे सावंत म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन सावंत यांनी “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एका भोंदू बाबाचे पाय धुवून महिलांचा अपमान केला आहे. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.” असे सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here