Home मुंबई *विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती...

*विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

36
0

*शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा समावेश करणार – मंत्री दादा भुसे*

मुंबई, दि. १२ मार्च २०२६ : महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेत लक्षवेधी क्र. ३ अंतर्गत चर्चा करण्यात आली. या विषयावर सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने या विषयावर आधी मी बैठक घेतली आहे, त्याचा आपण पाठपुरावा करावा. शाळांच्या बसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरविण्याऐवजी शाळेच्या आवारातच उतरवून शिक्षकांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे, अशा सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत. विशेषतः लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यातच सुरक्षितपणे सोपविण्याची जबाबदारी शाळांनी काटेकोरपणे पार पाडली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा व्यवस्थापनाने या सूचनांचे पालन न केल्यास शालेय शिक्षण विभागाने परिवहन विभागाशी समन्वय साधून याबाबत स्पष्ट परिपत्रक काढावे.”अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

काही ठिकाणी शाळांना अडचणी असल्यास महानगरपालिका आयुक्त किंवा स्थानिक प्रशासनाकडूनही मदत घेता येईल, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालकांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी काही ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. शाळेच्या बसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनी रोटेशन पद्धतीने सहभाग घेतल्यास मुलांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष ठेवता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सखी-सावित्री समिती व महिला संस्थांनी केलेल्या निरीक्षणांनुसार अनेक शाळांमध्ये काही प्रमाणात उपाययोजना होत असल्या तरी पालकांचा सहभाग मर्यादित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित मॉनिटरिंग करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आरोग्य आणि गृह विभागांची बैठक आयोजित करावी, अशी सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि यापूर्वीही यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. काही दुर्दैवी घटना घडत असल्या तरी अशा विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन परिपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सूचनांसह पालकांच्या सहभागाबाबतच्या मुद्द्यांचाही समावेश करण्यात येईल.”असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here