अर्ज बाद केलेल्या उमेदवाराला पुन्हा संधी!
नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग क्रमांक १७ (अ) विषयी महत्त्वाची माहिती आली आहे. इथे भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. न्यायालयाने भोजनेंना दिलासा देताना त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकारही दिलाय.
*हे प्रकरण काय?*
भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांनी प्रभाग १७ (अ) मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी भोजनेंच्या मालमत्तेत अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम १० (१ ड)नुसार निलेश भोजने यांचा अर्ज बाद ठरवला होता.
या निर्णयाविरुद्ध निलेश भोजने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमुर्ती चंद्रशेखर आणि न्यायमुर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की, “निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.”
सुुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले की, अनधिकृत बांधकामाशी संबंधित अपात्रतेचे कलम हे निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी लागू होते की उमेदवारांसाठी, यावर कायदेशीर चर्चा आवश्यक आहे. अर्जावरील स्थगिती उठवून न्यायालयाने निलेश भोजने यांचा निवडणूक लढण्याचा रस्ता मोकळा केला आणि त्यांच्या नावाचा समावेश उमेदवार यादीत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.





















