मुंबई
“शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. शिक्षकांनी काही चिंता करू नये, एका दिवसाच्या आत तुमची मागणी मार्गी लावतो.” असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी खासदार नीलेश लंके यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की,”शासकीय आणि निम शासकीय कर्मचारी महाराष्ट्राच्या सरकारचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी. शिक्षकांवर इतर सरकारी कामाची देखील जबाबदारी असते. तशी सरकारची देखील त्यांच्या प्रती काही जबाबदारी आहे. शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ नये”
“शिक्षकांच्या मागण्यांसाठी जितक्या पैशाची गरज असेल, त्याची देण्याची तयारी ठेवा. त्यासाठी आर्थिक तरतूद करा. शिक्षकांवर उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी असल्यामुळे , त्यांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्याने का देता?” असा प्रश्न देखील शरद पवार यांनी राज्य सरकारला विचारला . दोन दिवसात शिक्षकांच्या मागण्या संदर्भातील निर्णय घेण्याची मागणी देखील या वेळी शरद पवार यांनी केली आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की,”शिक्षक हे नवी पिढी घडवणारा घटक असून तोच आज पावसामध्ये, चिखलामध्ये इथे बसतो. ही वेळ त्याच्यावर येत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मला रोहित पवार यांच्याकडून समजले की, राज्याचे मंत्री इथे येत आहेत. मंत्री येत आहेत, ते ठीक आहे. ते चर्चा करतील आणि प्रश्न सोडवतील. मात्र, प्रश्न अद्याप सुटलेला नाही ,याचा अर्थ राज्यकर्त्यांना प्रश्न सांगावे लागेल. उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, उद्याची महाराष्ट्राची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना संघर्ष करायची वेळ येऊ देऊ नका”, असेही शरद पवार यांनी सांगितले.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, त्यामुळे लवकरात लवकर त्यासाठी लागेल त्या निधीची तरदूत करा आणि तो द्यायला सुरूवात करा आणि राज्यात शिक्षकांचा सन्मानच करा, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू, शिवाय याबाबतचा निर्णय एका दिवसाच्या आत निर्णय घ्यावा त्यापेक्षा जास्त वेळ लावू नये. प्रशासनाचं मला थोडं फार समजतं. प्रशासना संबंधी काही काळजी करू नका. 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं आहे. त्यामुळे कसा निर्णय घ्यायचा कशी तरदूत आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते ते मला माहिती आहे, असे म्हणत शरद पवार साहेब यांनी शिक्षकांना निश्चिंत रहा असा सल्लाही दिला आहे.






















