_महापारेषणची अत्याधुनिक ‘केबल फॉल्ट लोकेटर व्हॅन’ दाखल; भूमिगत वीजवाहिन्यांतील बिघाडाचा शोध आता जलद आणि अचूक_
_अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन; राज्यातील वीज पारेषण यंत्रणा अधिक सक्षम होणार_
*मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२६ -*
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वीज पारेषण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांमधील दोष जलद आणि अचूकपणे शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘केबल फॉल्ट लोकेटर व्हॅन’चे उद्घाटन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर, संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर, कार्यकारी संचालक (संचलन) पियुष शर्मा, कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनील सूर्यवंशी, मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, जुईली वाघ, किशोर गरूड, अमित नाईक, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) नागसेन वानखेडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापारेषणच्या वाशी, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिमंडळात १३२ के.व्ही. व २२० के.व्ही. क्षमतेच्या भूमिगत अतिउच्चदाब वीजवाहिन्यांचे विस्तृत जाळे आहे. या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास नेमके ठिकाण शोधण्यासाठी पूर्वी बराच वेळ लागत होता आणि बाह्य यंत्रणांची मदत घ्यावी लागत होती. या व्हॅनमुळे ही प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि कार्यक्षम होणार आहे.
या मेगर कंपनीच्या आर-३० मॉडेलच्या वाहनात ४०० के.व्ही.पर्यंतच्या भूमिगत वीजवाहिन्यांमधील विविध दोष शोधण्यासाठी सर्ज जनरेटर, प्री-लोकेशन युनिट, केबल रूट ट्रेसर, केबल आयडेंटिफिकेशन युनिट, शीथ फॉल्ट लोकेटर आणि दोषाचे अचूक ठिकाण निश्चित करणारी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.
या यंत्रणेमुळे अनावश्यक खोदकाम टाळणे शक्य होणार असून दुरुस्तीवरील खर्च आणि वेळेत बचत होऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
महापारेषणच्या या उपक्रमांतर्गत पहिली व्हॅन ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर परिमंडळासाठी प्राप्त झाली आहे. तिचा लाभ नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती परिमंडळांना होणार आहे. दुसरी व्हॅन नोव्हेंबर अखेर वाशी परिमंडळासाठी प्राप्त होणार असून तिचा उपयोग वाशी, पुणे, नाशिक आणि कराड परिमंडळात होणार आहे. त्यामुळे राज्यातील सात परिमंडळांतील भूमिगत वीज पारेषण व्यवस्थेच्या देखभाल-दुरुस्तीला मोठी मदत होणार आहे.
राज्यातील वाढती विजेची मागणी, औद्योगिक विस्तार आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वीज पारेषण व्यवस्थेची विश्वासार्हता वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असून महापारेषणचा हा उपक्रम त्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*फोटोओळ:* मुंबई येथे महापारेषणच्या ‘केबल फॉल्ट लोकेटर व्हॅन’चे उद्घाटन करताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार. समवेत संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी.
—
*संपादक:* प्रो. शीतल करदेकर,माईमीडिया२४
























