आर्थिक अडचणीमुळे एकही बालक शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही — एक हजार शस्त्रक्रिया तातडीने पूर्ण करणार!
शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
*श्रीनगरमधील ७२ बालकांच्या उपचारांचीही जबाबदारी स्वीकारली; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या कार्याचे विशेष कौतुक*
*मुंबई, ता. ०६ —* कोणत्याही बालकाला आर्थिक अडचणीमुळे आवश्यक शस्त्रक्रियेपासून वंचित राहावे लागणार नाही. कॉक्लिअर इम्प्लांट, हृदयशस्त्रक्रियांसह प्रलंबित असलेल्या एक हजार शस्त्रक्रिया तातडीने पूर्ण केल्या जातील. श्रीनगरमधील ७२ बालकांच्या शस्त्रक्रियांची जबाबदारीही स्वीकारली असून उपचारांसाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हृदयशस्त्रक्रिया आणि कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकांसह त्यांच्या पालकांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या पुढाकारातून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी संकटाची असताना या बालकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद वेगळाच असल्याचे ते म्हणाले. ११ कुटुंबांनी कथन केलेले अनुभव हृदयद्रावक होते.
*नऊ वर्षे अविरत रुग्णसेवा —*
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन आणि मंगेश चिवटे यांची वैद्यकीय मदतनिसांची टीम गेली नऊ वर्षे रुग्णसेवेचे काम अविरतपणे करत आहे. रुग्णाचे निदान, रुग्णालयात दाखल करणे, शस्त्रक्रिया, एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आणि उपचारांनंतर नियमित फॉलोअप अशी संपूर्ण जबाबदारी ही टीम पार पाडते.
कॉक्लिअर इम्प्लांटनंतर एका मुलीची आयआयटीमध्ये, तर दुसऱ्याची इस्रोमध्ये निवड झाल्याचा अभिमान वाटतो. आदित्य ठोसरने कॉक्लिअर इम्प्लांटच्या अनुभवावर लिहिलेल्या *’माय वर्ल्ड ऑफ साऊंड’* या पुस्तकाचे आणि ठाणे महापालिकेत शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या मुलांनी सादर केलेल्या नाटकाचे शिंदे यांनी कौतुक केले.
ठाणे महापालिकेत यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे ५० ते ६० कोटींची मदत देऊन या महागड्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ठाण्यात सुरू झालेली अर्ली डिटेक्शनची व्यवस्था इतर महापालिकांतही सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅन्सर उपचारांसह ठाण्यात संपूर्ण कॅशलेस उपचारांची सुविधा असलेली रुग्णालये उभारल्याचेही त्यांनी सांगितले.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर आजही सुरू आहे. ठाण्यात नवरात्रोत्सवात ११ हजार रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून काश्मीरमधील लष्करी रुग्णालयात सलग दोन वर्षे प्रत्येकी एक हजार रक्तदात्यांचे रक्तदान करण्यात आले. कोविड तसेच केरळ, कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीतही डॉक्टरांची टीम मदतीला धावली, असे शिंदे म्हणाले.
*उपस्थित मान्यवर —*
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष सिंह, डॉ. अमोल गीते, डॉ. रमेश काझगी, डॉ. श्रीनिवास, डॉ. उपल, डॉ. आशिष भुमकर, डॉ. ऋषिकेश वैद्य, डॉ. सुधीर कदम, डॉ. आदित्य मानके, डॉ. निखिल जाधव, डॉ. मिनी बोधनीवाला, डॉ. जितेंद्र हरियान, डॉ. संतोष शेट्टी, डॉ. नीरज उत्तम, डॉ. मनोज सिंगल तसेच विविध माध्यमांचे संपादक व प्रतिनिधी, उपचार घेतलेल्या बालकांचे पालक उपस्थित होते.
























