Home मुंबई *अमरावतीतील वाघिणीचा तातडीने रेस्क्यू करा; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – महसूल मंत्री...

*अमरावतीतील वाघिणीचा तातडीने रेस्क्यू करा; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

28
0

*अमरावतीतील वाघिणीचा तातडीने रेस्क्यू करा; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

*मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२६*
अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांचा तातडीने बचाव आणि नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. बाधित भागात तातडीने रेस्क्यू पथके रवाना करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच संपूर्ण मोहिमेदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने सतर्क ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार रवी राणा, गजानन लवटे, उमेश यावलकर, प्रताप अडसड, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अमरावती वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती ज्या भागातून प्राप्त होत आहे, त्या परिसरात विलंब न करता रेस्क्यू पथक पाठवावे. नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

वडाडा येथील रेस्क्यू सेंटर तातडीने कार्यान्वित करून मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. रेस्क्यू कारवाईसाठी मनुष्यबळ अथवा सुरक्षाव्यवस्थेची कमतरता भासणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

रेस्क्यू मोहिमेदरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करावा. जिल्हाधिकारी आणि संबंधित मुख्य वनसंरक्षक यांनी समन्वयाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. झालेल्या नुकसानीची क्षेत्रनिहाय तसेच हेक्टरनिहाय माहिती प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करावी, असे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले.

दरम्यान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. राज्यात वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढत असल्याने अशा घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी केंद्रीकृत यंत्रणा उभारण्यासोबतच अतिरिक्त पथके आणि स्वतंत्र टास्क फोर्स तयार करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांकडून किंवा सोशल मीडियातून वन्यप्राण्यांच्या वावराची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने तत्काळ प्रतिसाद देऊन घटनास्थळी पोहोचावे, यासाठी २४ तास कार्यरत ‘स्मार्ट स्क्वाड’ उभारण्याची सूचना नाईक यांनी केली. त्यासाठी केंद्रीकृत नियंत्रण कक्ष आणि माहिती तातडीने संबंधित पथकांपर्यंत पोहोचविणारी सक्षम यंत्रणा विकसित करावी, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांची सुरक्षितता, वन्यप्राण्यांचा तातडीने बचाव आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई या तिन्ही बाबींवर संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने वेगाने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here