*स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*
*मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२६ | MAI MEDIA 24*
प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य आणि भंगारात जमा झालेल्या (स्क्रॅप) रिक्षांवर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर एकही स्क्रॅप रिक्षा दिसता कामा नये, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री *प्रताप सरनाईक* यांनी दिल्या आहेत. यासाठी *५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष मोहीम* राबवून सर्व RTO कार्यालयांनी अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त *राजेश नार्वेकर*, सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रिक्षा युनियनचे नेते उपस्थित होते.
*काय आहे कारवाईचा फोकस?*
> “प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा – प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असा सज्जड दम मंत्री सरनाईक यांनी RTO अधिकाऱ्यांना भरला.
या विशेष मोहिमेत खालील बाबींवर भर दिला जाणार आहे:
*१. स्क्रॅप रिक्षांचा पुन्हा वापर:* भंगार म्हणून घोषित केलेल्या रिक्षा बेकायदेशीरपणे दुरुस्त करून पुन्हा रस्त्यावर आणल्या जात आहेत. अशा रिक्षा ताबडतोब जप्त करा.
*२. बनावट कागदपत्रे:* फिटनेस, परमिट आणि विमा नसलेल्या, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे धावणाऱ्या रिक्षांची कसून तपासणी करा.
*३. नियमांचे उल्लंघन:* मीटरमध्ये फेरफार, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करा.
*प्रवाशांसाठी आवाहन*
या मोहिमेदरम्यान नागरिकांनीही सहकार्य करावे. जर आपल्याला अतिशय जीर्ण, तुटकी-फुटकी स्क्रॅप रिक्षा दिसल्यास, तिचा फोटो आणि नंबर RTO च्या टोल फ्री क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
*वृत्त: जे सत्य सांगते | सद् रक्षणाय खल दमनाय*
—






















