*अक्षर.. अश्रू आणि गुलाल…*
*पेपर फुटी,नोकऱ्या चोरी जरी झाल्या तरी सत्याचा कष्टाचा गुलाल उधळला जातोच हे सांगणारे*
*श्रीकांत पवार यांचे हे मनोगत म्हणजे नोकऱ्यांच रॅकेट चालवणाऱ्या आणि या दुकानातून खरेदी करणाऱ्या गांडुळांना मारलेली चपराक आहे- संपादक*
स्वतःला अब्रुदार समजणाऱ्या नोकऱ्या चोरांनी मेहनती गुणवंतांच्या नोकऱ्या खाल्ल्या मात्र गुणवंतांनी, संघर्ष संयम सातत्य प्रामाणिक प्रयत्नातून यशाचा गुलाल उधळला’च…..
पवित्र पोर्टल शिक्षक भरती निकाल अनेकांना नवचैतन्य नवजन्म देणारा ठरला… वयाच्या चाळीशी पर्यंत आणि
किमान दीड दशक पुस्तकांना आणि पाठ सोडत नसलेल्या जीवघेण्या अपयशाला चिटकुन बसलेल्या माझ्या जिवलग सहप्रवासी शरद धात्रक सर,सचिन मोरे, राजू दुकळे,राहुल ह्या मित्रांच्या आयुष्यात यशाचा गुलाल आसमंती उधळला…
ह्या मित्रांनी प्रचंड असहाय्य, अवहेलना, संघर्षाला कंटाळून पेपर फोडले नाहीत किंवा यांच्या बापाने खोकेभर पैसे देऊन गुणवंतांच्या पोटावर लाथ मारून मागच्या दराने नोकऱ्या विकत घेतल्या नाहीत, शिक्षणं विभागात संस्थाचालक-मुख्याध्यापक-शिक्षण अधिकारी-दलाल मध्यस्थांमार्फत सुरू असलेल्या २५/३० लाख द्या अन् बॅक डेट शिक्षक ऑर्डर करून लाखोंचे फरक बिले काढून , मागील अनेक वर्षांच्या जुन्या ऑर्डर करून दिल्या जात असताना त्या ऑफर सुद्धा यांच्या विचारधारेला डळमळीत करू शकल्या नाहीत… स्पर्धा परीक्षेतला संघर्ष सोडला नाही.
जे खरोखर गुणवंत असतात – जे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायची जिद्द ठेवतात, ज्यांचं स्वतःच अस्तित्व असतं ते स्वतःला सिद्ध करतात आणि दाखवून देतात की, कोण आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे असू शकतात…!
कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी अब्रुदार असावं लागत, ज्यांच्या आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?, नाही का..?
कितीही संकटे, अपयश,संघर्ष,अवहेलना, कौटुंबिक विवंचना, कलह, आणि कितीही सामाजिक, आर्थिक त्रास असला तरी लढण्याच्या संधीच सोन फक्त लढवय्येच करू शकतात.
बॅक डेट ऑर्डर करून शिक्षक होणारे, भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीतून फरक बिले गिळणारे, नोकऱ्या चोर…यांना काय संघर्ष समजणार..
बववस्वाभिमानाने ताठ मान करून जगायला स्वतःला सिद्ध आणि स्वनिर्माण व्हावं लागत, *यशाचा गुलाल उधळण्याचा आनंद नशिबी लाभावा लागतो..*
… माझ्या अनेक यशस्वी झालेल्या मित्रांचा संघर्ष इतका हृदयद्रावक आहे की, शब्दांकित करणेही अश्यक आहे.गावखेड्यातून स्वप्न आणले साकार करण्यासाठी रोज संघर्ष केला. डोळ्यात तेल घालून रात्र दिवस अभ्यास केला कारण डोळ्यात कष्टकऱ्या आईबापाचे स्वप्न होत
अंगावर मेंचटलेले कपडे,चेहऱ्यावर भविष्याची भिती,नात्यांची अवहेलना, रुपयाची चनचन, विखुरलेल भावविश्व…,
….ह्या सर्व वेदना पैसे दिले-जमीन विकली-प्लॉट विकला-लाखो दिले म्हणणाऱ्या नोकरी चोरणाऱ्या चोट्यांना काय समजणार…शेवटी विकून फुकून गहाण ठेवूनच दिले ना! मेहनत अभ्यास कष्ट केले का?!… स्वतःला सिद्ध करून थोडी ना दाखवू शकले..!
… पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत यशस्वी झालेल्या माझ्या सर्व मित्रांमुळे अनेक खचलेल्या अपयशी मुलांना पुन्हा लढण्याचे आणि जिंकण्याचे नवंचैतन्य संचारेल.,…प्रयत्न करीत असणारा प्रत्येक परीक्षार्थी आपल्या सर्वांच्या यशाच्या उदाहरणातून मरगळ सोडून पेटून उठेल…आणि विजयी गुलाल उधळण्यासाठी पुन्हा जोमाने सज्ज होईल.
*यशस्वी झालेल्या माझ्या सर्व मित्रांचे अभिनंदन व शुभेच्छा…*
— श्रीकांत पवार





















