Home मुंबई *‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडून...

*‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडून पाहणी*

31
0

*‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडून पाहणी*

*पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश*

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२६) परिमंडळ ७ अंतर्गत दहिसर व बोरिवली परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

रस्ते व पदपथांची पाहणी करताना पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणीदरम्यान आर मध्य विभागातील बोरिवली पूर्व परिसरातील महात्मा गांधी मार्ग, बोरिवली पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग तसेच आर उत्तर विभागातील स्वामी विवेकानंद मार्ग, हरिशंकर मार्ग, भरूचा मार्ग आणि दहिसर रेल्वे स्थानक परिसराला डॉ. विपिन शर्मा यांनी भेट दिली.

या विविध ठिकाणी पदपथांची सद्यस्थिती, पादचाऱ्यांची वर्दळ, पदपथांवरील अतिक्रमणे तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणींची त्यांनी पाहणी केली.

‘पादचारी प्रथम’ अभियानाचा मुख्य उद्देश मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अडथळामुक्त करणे हा आहे. त्या अनुषंगाने पदपथांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले तसेच पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले.

पादचाऱ्यांना पदपथाचा पूर्णपणे वापर करता यावा आणि रस्त्यावरून चालण्याची वेळ येऊ नये, यासाठी पदपथ मोकळे ठेवण्यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

दरम्यान, आर मध्य आणि आर उत्तर विभागातील मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points – GVPs) देखील डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. या ठिकाणी कचरा साचण्याची कारणे, नियमित स्वच्छता व्यवस्था तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.

मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांच्या दर्शनी भागावर नागरिकांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी ‘कचरा टाकू नये’ या आशयाचे सूचना फलक लावण्याचे निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले. तसेच अशा ठिकाणी नियमित स्वच्छता राखण्यासोबतच पुन्हा कचरा साचणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते व पदपथ अधिक सुरक्षित, सुकर आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

या पाहणीदरम्यान उप आयुक्त (परिमंडळ ७) मनिष वळंजू, सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) डॉ. प्रफुल्ल तांबे, सहायक आयुक्त (आर उत्तर विभाग) रोहित त्रिवेदी यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here