Home वाशीम / बुलढाणा / अकोला / यवतमाळ स्वातंत्र्याची दौलत🇮🇳-रा.ग.सोनुने,बुलढाणा

स्वातंत्र्याची दौलत🇮🇳-रा.ग.सोनुने,बुलढाणा

52
0

🇮🇳स्वातंत्र्याची दौलत🇮🇳

भारत देश म्हणजे जणू पुराणपुरुष.हा पुराणपुरुष जगासाठी आतापर्यंत कल्याणमित्र ठरला आहे व पुढेही निश्चितच कल्याणमित्र ठरेल,यात तीळमात्र शंका नाही.भारत देशाची महिमा अवर्णनीय अशी आहे.उत्तर दिशेला हिमालय व दक्षिणेस हिंदी महासागर ही भारताची प्राकृतिक ओळख आहे.असा हा कल्याणमित्र विश्वगुरु आहे.

ही माय थोर होईल,वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल….

या पुज्य सानेगुरुजींच्या ओळी भारताला जगात विशेष बनवतात.अशा या आपल्या विश्ववंदनीय भारत देशाने जगाला अध्यात्मिक सौंदर्याची,बंधुत्वाची,शांतीची देणगी दिली.येथील हजारो ऋषीमुनींनी देशाला व जगाला उपदेश दिला.येथील संतांनी लोककल्याणार्थ समाजाचे प्रबोधन केले.हजारो ऋषीमुनींनी त्यांच्या उपदेशाने भारतालाच नव्हे तर जगालाही हिमशिखरी चढविले.भारत देशातील ग्रंथांनी,काव्यरचनांनी जगाला शांतीचा,ज्ञानाचा व सहअस्तित्वाचा ‘वस्तुपाठ’ दिला.दया,क्षमा आणि शांतीचा उपासक असलेला आपला देश अनन्यसाधारण असा आहे.या देशात संस्कृती,संस्कार,आचार, व्यवहार,सौजन्य,प्रेम, ध्यानसाधना व अष्टांगयोग आहे.पतंजलींचे योगविज्ञान,व्यासांचे महाभारत,महर्षी वाल्मिकींचे रामायण माणसाला दैवत्वाची दिव्य अनुभूती करुन देतात.१८ पुराण व ४ वेदांनी समृध्द अशी साहित्य रचना भारताची विशेष ओळख आहे.
समृध्द व सौंदर्यशाली अध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण व शांततावादी असलेल्या आपल्या भारताला परक्यांची नजर लागली व आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत सापडला.नेहमीच सत्याच्या,अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या देशाला ग्रहण लागले.वेगवेगळ्या प्रदेशात,संस्थानात विखुरलेला आपला देश इंग्रजांच्या वर्चस्वाखाली गेला.सांगा पाहू,असे काय कारण होते की आपला खंडप्राय भारत देश इंग्रजांचा गुलाम झाला? वेगवेगळ्या संस्थानिकांनी आपापली चुल मांडली होती.वेगवेगळ्या प्रादेशिक सत्तेमध्ये एकमत नव्हते,एकवाक्यता नव्हती.परस्परांमध्ये हेवेदावे होते.ही बाब इंग्रजांनी ओळखली.त्यांनी ‘फोडा व झोडा’ या रणनितीचा वापर केला.यात इंग्रज प्रचंड यशस्वी झाले.स्वातंत्र्याची दौलत मोठ्या संकटा सापडली.देशाचे मला काय?अशी भावना येथील माणसाची झाली.भगतसिंग जन्माला यावा पण शेजारच्या घरी,माझ्या घरी नाही असा विचार जो-तो करु लागला.अंधश्रध्दा,परस्परांतील दुही,अज्ञान,देशप्रेमाचा अभाव असणारा आपला देश गुलामगिरीत गेला,यात नवल ते काय!
परंतु गुलामगिरी सदासर्वदा चालत नसते.गुलामगिरीच्या विरोधात येथे रणशिंग फुंकले गेले.महान स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांना सडेतोड उत्तर दिले.राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ‘चले जाव’ चा नारा दिला त्यामुळे इंग्रजी सत्ता हादरली.भगतसिंग,सुखदेव व राजगुरुंनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्राणाची बाजी लावली.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’ उभी केली त्यामुळे इंग्रज प्रचंड घाबरले.अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.आपला भारत देश हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरु शकणार नाही.स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीयांनी स्वातंत्र्याची पहाट अनुभवली.

गुलामगिरीच्या बेड्या तुटल्या
चारही दिशा सुखाने हसल्या,
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने
मनी स्वातंत्र्य दौलती सजल्या.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आतापर्यंत आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे.माहिती तंत्रज्ञान,शेती,शेतीसाधने,उद्योग,व्यापार इ.क्षेत्रात भारताने कामगिरीचा उच्चांक गाठला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण चांद्रयान मोहीम फत्ते केली.आपल्या भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे.विविध क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.देशाची सेवा करणारी माणसे पुढे येत आहेत.आपले परराष्ट्र धोरण अधिक कणखर बनले आहे.’एकच लक्ष्य,सदैव दक्ष’ याप्रमाणे भारतीय नवजवान सीमेवर देशाचे डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहेत.अशा नवजवान सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.कारगिल युध्द असो अथवा पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे असो….भारतीय सैनिकांनी शत्रूला सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
‘माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु,जिंकू किंवा मरु’ ही घोषणा आम्ही केली आहे.आम्ही भारतीय एकजुटीने देशाचे संरक्षण करु.आम्ही आता आमच्या ‘स्वातंत्र्याची दौलत’ परक्याचे धन होणार नाही,याची पुरेपूर काळजी घेऊ.भारताला विविधतेने समृद्ध करु.या देशात बंधुभाव नांदावा,गरिबी दूर व्हावी,जातीपाती मिटाव्या यासाठी आम्ही भारतीय जोरदार प्रयत्न करु व यात यशस्वी होऊ.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आचार-विचार लक्षात ठेऊ व त्यांच्या ओळी स्मरु…..

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे,
दे वरचि असा दे।
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे,मतभेद नसू दे।।धृ।।

जय हिंद,जय भारत!
🇮🇳🌹

🖋️रा.ग.सोनुने,बुलढाणा
मो.८८८८४२०६२९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here