Home मुंबई *पेणच्या गणेशमूर्ती कलाकारांच्या व्यथेची आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल*

*पेणच्या गणेशमूर्ती कलाकारांच्या व्यथेची आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल*

31
0

*पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला तातडीने दिलासा द्या; २०२१ प्रमाणे विशेष मदत पॅकेज जाहीर करावे – आ.डॉ. नीलम गोऱ्हे*

मुंबई, दि. १४ : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अतिवृष्टी, पाताळगंगा नदीला आलेला पूर तसेच धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गणेशमूर्ती उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या, माजी उपसभापती विधानपरिषद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. मकरंद पाटील आणि उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त मूर्तिकारांना २०२१ च्या पूरस्थितीप्रमाणे विशेष बाब म्हणून आर्थिक मदत व पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशभरात गणेशमूर्ती निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये शेकडो कार्यशाळांमध्ये पाच ते सहा फूट पाणी शिरल्यामुळे तयार व अर्धवट तयार गणेशमूर्ती, साचे, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना हजारो मूर्तिकार, कारागीर आणि कामगारांपुढे उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.

यापूर्वी २०२१ मधील पूरपरिस्थितीनंतर शासनाने गणेशमूर्ती उद्योगासाठी विशेष उपाययोजनांचा विचार केला होता. त्याच धर्तीवर याही नुकसानीची विशेष बाब म्हणून दखल घेऊन स्वतंत्र आर्थिक मदत व पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच सर्व बाधित कार्यशाळांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, उद्योग विभागामार्फत कमी व्याजदराचे कर्ज व विशेष अनुदान उपलब्ध करून देणे, तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना आणि गणेशमूर्ती कार्यशाळांना एसएमएस, मोबाईल अलर्ट, सायरन व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेळेवर पूर्वसूचना देण्याची प्रभावी यंत्रणा विकसित करण्याची मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

याशिवाय जलसंपदा, मदत व पुनर्वसन, महसूल आणि उद्योग विभाग यांच्या समन्वयातून पूरप्रवण भागातील गणेशमूर्ती उद्योगासाठी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना व कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

पेणचा गणेशमूर्ती उद्योग हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असल्याने शासनाने या विषयात तातडीने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त मूर्तिकारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here