Home मुंबई *वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीव्र शोकसंवेदना*

*वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीव्र शोकसंवेदना*

29
0

*भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; संबंधित यंत्रणांना अधिक दक्षतेच्या सूचना*

*मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, तर जखमी वारकऱ्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश*

मुंबई,

विठुरायाच्या दर्शनासाठी भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात झालेल्या भीषण अपघाताबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या वारकऱ्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे श्रद्धास्थान असून लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला राज्य सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून संपूर्ण वारी मार्गावर सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या दुःखद दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त करत, दिवंगत आत्म्यांना सद्गती लाभो आणि जखमी वारकरी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी केली आहे.

……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here