*उत्रोली-वडगाव एमआयडीसी प्रकल्प शेतकऱ्यांशी समन्वय साधून तातडीने मार्गी लावा;प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या;उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश…*
मुंबई, दि. १० जुलै – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात प्रस्तावित उत्रोली–वडगाव एमआयडीसी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांशी विश्वासपूर्वक संवाद साधून समन्वयाने कार्यवाही करावी. त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य जनजागृती करावी तसेच शेतजमिनीला योग्य मोबदला मिळेल, याची पूर्ण काळजी घ्यावी, प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.
उत्रोली–वडगाव एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, भोर पंचायत समितीच्या सभापती मनीषा कंक, उपसभापती विशाल कोंडे, भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष नाना आवारे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, प्रवीण जगदाळे, तसेच संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, चंद्रकांत भाटे, केदार देशपांडे, अतुल काकडे, कुणाल धुमाळ, अनिल भेलके यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
भोर तालुक्याचा मोठा भाग डोंगरी-दुर्गम असून रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक युवकांना पुणे, मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागते. अशा परिस्थितीत उत्रोली–वडगाव एमआयडीसी प्रकल्प हा या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या औद्योगिक प्रकल्पामुळे परिसरात नवीन उद्योग उभे राहतील, स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, पूरक व्यवसायांना चालना मिळेल आणि भोर तालुक्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
मात्र हा प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्याशी सातत्याने संवाद साधावा, विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि सर्व संबंधितांच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बैठकीत दिले.



















