*समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताबाबत विजय वडेट्टीवार यांनी वेधले सरकारचे लक्ष*
मुंबई, दि. १ :
विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दोन गंभीर आणि जनहिताच्या विषयांवर औचित्याच्या माध्यमातून सूचना मांडत राज्य सरकारकडून तातडीने ठोस कारवाईची मागणी केली.
नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेचा मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. बीड, नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाणे आदी भागांतील अनेक तरुणांना सोशल मीडियावरील आकर्षक नोकरीच्या जाहिराती दाखवून थायलंडमार्गे म्यानमारमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना तथाकथित आयटी पार्क’
मध्ये डांबून १६ ते १८ तास सायबर फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे. काम करण्यास नकार दिल्यास अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील २० ते २५ तरुणांचा समावेश आहे. हा आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गंभीर विषय असल्याने राज्य सरकारने या तरुणांची तातडीने सुरक्षित सुटका करावी.
यासोबतच वडेट्टीवार यांनी समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांवरही सरकारला धारेवर धरले. नुकत्याच धामणगाव रेल्वे परिसरात उभ्या कंटेनरला कारची धडक बसून चंद्रपूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
महामार्गावर उभी राहणारी अवजड वाहने, अपुरी सुरक्षा व्यवस्था, आवश्यक सुविधा आणि नियंत्रण यंत्रणेचा अभाव यामुळे नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप करत, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या महामार्गावर अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले की, हा केवळ अपघात नसून महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणातून घडणारी मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही गंभीर प्रकरणांमध्ये तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अशी त्यांनी विधानसभेत मागणी केली.


















