*आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस;*
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १९ जून :
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वेने, खासगी वाहनांनी आणि एसटीने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भाविकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाने व्यापक नियोजन केले आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास अधिक किफायतशीर आणि सुलभ होणार आहे.
मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५,२०० विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सक्षम नियोजन करण्यात आले आहे.
*वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी*
वारीदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. सुमारे १३ हजार कर्मचारी या सुविधेचा लाभ घेणार असून, सेवाभावाने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती मंत्री सरनाईक यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना एसटीची साथ
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियोजन अधिक प्रभावी होऊन भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
पंढरपुरात चार तात्पुरती बस स्थानके
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्यभरातील भाविकांनी एसटीच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख सेवांचा लाभ घेत विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून एसटी यंत्रणा संपूर्ण यात्राकाळात अहोरात्र सेवेसाठी तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


















