Home Uncategorized नव्या काळातील बदलांचे आव्हान स्विकारणारी पिढी एमकेसीएलने घडवावी

नव्या काळातील बदलांचे आव्हान स्विकारणारी पिढी एमकेसीएलने घडवावी

75
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ (MKCL) चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रम संपन्न झाला.

“कुठल्याही समाजजीवनात नेहमीच आव्हाने येत असतात आणि त्या आव्हानांना उत्तर शोधणाऱ्या व्यक्ती व संस्था उभ्या राहतात. जगभर इंटरनेटची लाट येत असताना डिजीटल विषमतेचा प्रश्न सोडवून, ती सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल)’ केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

समाजातील एका विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ तात्कालिक लाभाचा विचार न करता दीर्घकालीन धोरण आखून ‘एमकेसीएल’ने जबाबदारीने आणि उत्कृष्टपणे कार्य केले आहे. राज्यभर६५०० उद्योजकांचे जाळे उभारून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था ‘एमकेसीएल’ने उभी केली आहे. यामुळे सामान्य माणसालाही या व्यवस्थेत सामावून घेण्यात यश आले आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) मोठे आव्हान समोर असताना, हे ज्ञान समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा महत्त्वाचा भाग झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मूल्ये आणि नवी आव्हाने स्वीकारून पुढे जाणे आवश्यक आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर या तीन क्षेत्रांमध्ये सक्षम मनुष्यबळ निर्माण करून महाराष्ट्र नव्या तांत्रिक लाटेत आघाडी घेईल.” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

“महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल असून, देशातील ६५% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात आहे. या सुविधा वापरण्याचा आणि त्यांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘एमकेसीएल’ने करायला हवा. माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेत महाराष्ट्राने जशी आघाडी घेतली, तशीच आघाडी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही घ्यावी लागेल. रोजगाराचे स्वरूप बदलत असताना नवे ज्ञान व तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली, तर राज्य सरकार त्यासाठी निश्चितच सहकार्य करेल. एमकेसीएलने विकसित केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५०,००० हजार पुस्तके वाचता येणार आहेत. एमकेसीएलच्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात ‘एमकेसीएल’ने लक्षणीय बदल घडवून आणले असून, पुढील २५ वर्षे बदल स्वीकारणारी नवी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकार आपली भूमिका ठामपणे पार पाडेल.”, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ तथा ‘एमकेसीएल’चे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here