गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा — ठाण्यात ‘लोककलेतील श्री गणेश’ कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन; ‘bappa.org’ मोहिमेचा नागरिकांना लाभ
*ठाणे, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘लोककलेतील श्री गणेश’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. १६ ऑक्टोबर रोजी दिमाखदार आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा वारसा अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली.
*२० कलाकारांचा लोककला जागर —*
नमन, गण, गोंधळी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागर-गोंधळ अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाने संपूर्ण प्रेक्षागृह भक्तिमय व उत्साही वातावरणाने दुमदुमून गेले.
हा कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांच्या ‘शेलारमामा फाउंडेशन’च्या समन्वयातून विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
*यशस्वी नियोजन —*
जिल्हा नियोजन अधिकारी आणि ‘bappa.org’ मोहिमेचे नोडल अधिकारी वैभव कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा सोहळा नेटका व भव्यदिव्य स्वरूपात पार पाडला.
*’bappa.org’ मोहिमेची माहिती —*
या कार्यक्रमात राज्य शासनाच्या ‘bappa.org’ मोहिमेबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक आणि सुटसुटीत गणेशोत्सव, मंडळांची नोंदणी, विविध शासकीय परवानग्या आणि गणेशोत्सवाशी संबंधित सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी ही डिजिटल प्रणाली प्रभावी ठरत आहे. त्यामुळे नागरिक आणि मंडळांना शासकीय प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे शक्य झाले आहे.
महाराष्ट्राची संस्कृती, आपली ओळख आणि आपला गणेशोत्सव हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवत लोककला आणि प्रशासकीय उपक्रमांचा हा अनोखा संगम ठाणेकरांसाठी अभूतपूर्व अनुभव ठरला.





















