Home मुंबई *गोकुळमध्ये सत्ताचोरी, लोकशाहीची हत्या करणारे आता लोकशाही वाचवण्याचा मोर्चा काढतात — हा...

*गोकुळमध्ये सत्ताचोरी, लोकशाहीची हत्या करणारे आता लोकशाही वाचवण्याचा मोर्चा काढतात — हा तर रावणांचा मोर्चा — काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका*

9
0

*गोकुळमध्ये सत्ताचोरी, लोकशाहीची हत्या करणारे आता लोकशाही वाचवण्याचा मोर्चा काढतात — हा तर रावणांचा मोर्चा — काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका*

*बागेश्वर बाबांनी विविध देवतांचा अपमान केल्यावर भाजपचे धर्मरक्षक कुठे लपून बसले आहेत? — वडेट्टीवार यांचा सवाल*

*मुंबई, दि. ५ नोव्हेंबर २०२६ :*

गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपला कौल दिलेला आहे. मात्र सत्तेच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांना बाजूला ठेवण्याचे, त्यांना परराज्यात नेण्याचे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा खेळ बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगावे की, संचालकांना बाहेर का नेण्यात आले? मतदानाचा अधिकार असलेल्या संचालकांना मतदानापासून दूर ठेवण्याचा हा प्रकार कशासाठी? १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व निवडून आलेल्या संचालकांना उपस्थित राहू द्या. बहुमताच्या आधारावर अध्यक्ष निवडला जाऊ द्या. मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

गोकुळच्या लढाईत आम्ही सतेज पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. सभासदांनी दिलेल्या कौलाचा अनादर आम्ही खपवून घेणार नाही. महायुतीकडून लोकशाहीच्या तत्त्वांनाच हरताळ फासला जात आहे. जनतेने आणि दूध उत्पादक सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या बहुमताचा अनादर करून संस्थेवर ताबा मिळवण्याचा कुटील डाव आखला जात आहे. हा केवळ गोकुळ दूध संघाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सहकार क्षेत्राची स्वायत्तता आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे.

*लोकशाहीची हत्या करणारे सत्ताधारी आता लोकशाही वाचवा म्हणून मोर्चा काढत आहेत. सत्तेत बसून अराजकता माजवणारे काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. हा तर रावणांचा मोर्चा आहे*, असा टोला वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

देशात धार्मिक तेढ निर्माण करून मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. दिया मिर्झा यांनी मांडलेल्या भूमिकेवर त्यांच्या आडनावाचा आधार घेऊन टीका केली गेली. एखाद्या व्यक्तीच्या आडनावावरून तिची भूमिका ठरवणे आणि हिंदू-मुस्लिम भेद निर्माण करणे ही देशाच्या एकात्मतेसाठी घातक बाब आहे. राहुल गांधी सत्य बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, मात्र देशात अराजकता कोण निर्माण करत आहे, याचे उत्तर भाजपने द्यावे.

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर आता भाजप मधील धर्मरक्षक कुठे लपून बसले आहेत? त्यावेळी देव, धर्म आणि हिंदूंच्या भावना दिसल्या नाहीत का? दुसऱ्यांनी काही बोलले की अंगावर धावून जायचे आणि या भोंदू लोकांनी देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली की गप्प बसायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी? प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे मत मिळवण्याचे किंवा देणग्या गोळा करण्याचे साधन नाहीत. धर्माचा वापर सत्तेसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी करू नये, अशी सडकून टीका वडेट्टीवार यांनी केली.

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here