Home पुणे पायल झांबरे मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी; हुंड्यासाठी सुनांचा छळ करण्याची...

पायल झांबरे मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी; हुंड्यासाठी सुनांचा छळ करण्याची विकृत प्रवृत्ती थांबली पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

13
0

पायल झांबरे मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी; हुंड्यासाठी सुनांचा छळ करण्याची विकृत प्रवृत्ती थांबली पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी डॉ. गोऱ्हे यांची चर्चा; पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार

स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट; कुटुंबीयांचे केले सांत्वन

पुणे, दि. ३ नोव्हेंबर २०२६ : पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल अक्षय झांबरे यांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे. मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहित महिलेचा मानसिक छळ करणे, हुंडा व मालमत्तेसाठी दबाव आणणे आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना नेत्या, विधानपरिषद सदस्या व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

पायल झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ अंतर्गत कारवाई सुरू असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

पायल यांना मुलगी झाल्याच्या कारणावरून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. तसेच जमीन नावावर करून देण्यासाठी दबाव आणला जात होता. ‘जमीन नावावर करून दे, अन्यथा आत्महत्या कर’ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे आरोप समोर आले आहेत. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

मेट्रोच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पायल झांबरे प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आहे.

पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केल्याचे त्यांनी नमूद केले. नसरापूर प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री आधार केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता शिंदे आणि आश्लेषा खंडागळे यांनी पायल झांबरे यांचे भाऊ श्री. ऋषिकेश पवार व त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत कुटुंबीयांच्या व्यथा आणि भावना समजून घेतल्या.

या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

“सुनांकडून ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती आता तरी थांबवा”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही काही कुटुंबांमध्ये सुनांकडून सोने, पैसे आणि मालमत्तेची मागणी करून त्यांचा छळ केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्रातील सर्व सासरच्या मंडळींना माझी एक भगिनी म्हणून हात जोडून विनंती आहे की, सुनांना सन्मानाने जगू द्या. त्यांच्याकडून काहीतरी हिसकावून घेण्याची आणि त्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती आता तरी बंद करा. अशा कृत्यांना कायद्याने कठोर शिक्षा होऊ शकते, याची जाणीव ठेवा. गेलेल्या मुलीचा जीव पुन्हा परत येणार नाही.”

त्याचबरोबर माहेरच्या कुटुंबीयांनाही त्यांनी महत्त्वाचे आवाहन केले. “मुलीचा संसार टिकावा म्हणून तिच्यावर सतत तडजोड करण्याचा दबाव आणू नका. गंभीर छळ होत असताना तिला पुन्हा त्याच वातावरणात राहण्यास भाग पाडणे धोकादायक ठरू शकते. मुलीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस तपासात सर्व पुरावे समोर आणण्याची मागणी

या प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांचा सहभाग असून, आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. पायल यांना वेळोवेळी दिलेल्या कथित धमक्या, मानसिक छळ, मालमत्तेसाठी दबाव आणि अन्य संबंधित पुरावे तपासात समोर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“केवळ आरोपींना पोलीस कोठडी मिळणे पुरेसे नाही. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याने शक्य असलेली कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी भूमिका आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

“हुंडाबळीच्या घटनांतील पीडितांना न्याय मिळणे हाच खऱ्या अर्थाने दीपावलीतील न्यायाचा प्रकाश ठरेल,” अशा शब्दांत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here