*‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची विश्वविक्रमी भरारी;*
*१.०७ लाखांहून अधिक स्पर्धकांची नोंदणी*
• *मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
• *५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे कार्यादेश;*
• *नवकल्पनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ५ कोटींचा निधी*
मुंबई, दि. ३ : ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला विद्यार्थी, युवक, नवउद्योजक आणि संशोधकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री स्पर्धेची अर्ज प्रक्रिया संपुष्टात आली असून, या स्पर्धेसाठी एकूण १ लाख ७ हजार ६०३ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. युवकांच्या नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेने विश्वविक्रमी कामगिरी केली असल्याची माहिती मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर उपस्थित होत्या.
मंत्री लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या नवोपक्रमाला महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली तसेच दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र झोनमधून स्पर्धेसाठी १ लाख ७ हजार ६०३ स्पर्धकांनी नोंदणी केली. यामध्ये ७९ हजार १६२ संघांचा सहभाग असून, ३२ हजार २९८ स्पर्धकांनी आपले प्रोफाइल पूर्ण केले आहे. तसेच, ६ हजार १९२ महिलांनी आणि १८ वर्षांखालील ४ हजार ५४९ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सामान्य प्रवर्गातून २१ हजार ५५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, स्पर्धकांकडून एकूण १६ हजार ५७ नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नगरविकास, आरोग्य व वैद्यकीय सेवा, संरक्षण, शाश्वतता (ऊर्जा, हवामान व संबंधित क्षेत्रे), पायाभूत सुविधा व वाहतूक, उदयोन्मुख तंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन व इतर तंत्रज्ञान) तसेच शिक्षण व रोजगारक्षमता अशा १० प्रमुख क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधले जाणार आहेत. प्रत्येक प्रमुख क्षेत्रांतर्गत पाच उपक्षेत्रांचा समावेश असून, अशा एकूण ५० उपक्षेत्रांमधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, या स्पर्धेतील ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे युवकांच्या कल्पनांना केवळ पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळणार आहे. युवकांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ, नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि समाजोपयोगी नवकल्पनांच्या अंमलबजावणीला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा युवकांच्या कल्पकतेची आणि उद्योजकीय क्षमतेची साक्ष आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला देशाची ‘इनोव्हेशन कॅपिटल’ बनविण्याच्या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. या स्पर्धेतील ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे, असे एकूण ५ कोटी रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. युवकांच्या कल्पनांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. युवकांनी नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक आणि नवोन्मेषक बनावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
*कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध महत्वपूर्ण उपक्रम*
सीएम महाफंड योजनेमध्ये महाराष्ट्राला नाविन्यतेची राजधानी बनविण्याच्या उद्देशाने या योजनेअंतर्गत ३० लाख नवोन्मेषक युवकांमधून निवडक एक लाख युवकांना पाच ते दहा लाख रुपयांपर्यंतचे विनातारण (कोलॅटरल फ्री) आणि अत्यल्प व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यासोबतच नवोदित उद्योजक आणि नवोन्मेषक युवकांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
अल्पकालीन अभ्यासक्रम (शॉर्ट टर्म कोर्सेस) अंतर्गत युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विविध अल्पकालीन अभ्यासक्रम मोफत शिकविण्यात येत आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान, विद्युत वाहन तंत्रज्ञान (ईव्ही), सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, मोबाईल दुरुस्ती व तंत्रज्ञ अभ्यासक्रम तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांसारख्या आधुनिक रोजगाराभिमुख कौशल्यांचा समावेश आहे.
नवयुगीन अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस)मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवयुगीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये सौर तंत्रज्ञ (विद्युत), विद्युत वाहन यंत्रतज्ज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञ (३डी प्रिंटिंग), कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामिंग सहाय्यक तसेच औद्योगिक रोबोटिक्स व डिजिटल उत्पादन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यस्तरीय समन्वय संस्थेमार्फत राज्यात नाविन्यता क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या माध्यमातून संबंधित संस्थांच्या कार्याला अधिक व्यापक दिशा देणे, परस्पर सहकार्य वाढविणे आणि राज्यातील नाविन्यता परिसंस्था अधिक सक्षम करणे हा यामागील उद्देश आहे.
000























