*शीव स्थानकाजवळील रेल्वे पूल पुनर्बांधणी कामाची महापौर रितू तावडे यांनी केली पाहणी*
शीव (सायन) स्थानकाजवळील रेल्वेवरील पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काल (दिनांक २ सप्टेंबर २०२६) सायंकाळी पाहणी केली. पुलाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दल महापौर तावडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर अंतिम कामे (finishing) दर्जेदार करावीत, दुभाजक आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवळ किंवा व्हर्टिकल गार्डन यांसारखे पर्याय तपासून पहावेत, असे निर्देशही महापौरांनी दिले.
या पाहणीवेळी एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष मानसी सातमकर, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाची संक्षिप्त माहिती प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांनी दिली. मध्य रेल्वेमार्फत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP – 2) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी व सहावी अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी शीव स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना व असुरक्षित ठरलेला पूल पुनर्बांधणीसाठी घेण्यात आला आहे. रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत, तर महानगरपालिका हद्दीतील पोहोचमार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक पोलीस विभागाच्या ना-हरकत परवानगीनुसार १ ऑगस्ट २०२४ पासून अस्तित्वातील पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार करून काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात पुलाच्या उत्तरेकडील भागाचे निष्कासन करण्यात आले, तर दक्षिणेकडील भाग पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वेमार्फत पुलाच्या दोन्ही गर्डरवरील काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही गर्डरच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या दोन्ही गर्डरवरील क्रॅश बॅरिअर तसेच काँक्रिट वेअरिंग कोटचे काम सुरू आहे. दरम्यान, मध्य रेल्वेमार्फत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण करून तो नागरिकांसाठी सुरू करण्यात आला असून उर्वरित भागाचे निष्कासन पूर्ण झाले आहे. निविदेनुसार प्रकल्पाची मुदत फेब्रुवारी २०२७ पर्यंत असली, तरी नागरिकांच्या सोयीचा विचार करून हा पूल त्यापूर्वीच सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मध्य रेल्वेसोबत समन्वय साधून सदर पूल ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून तो लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेमार्फत पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) दरम्यान पोहोचमार्गाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे नवीन भुयारी मार्ग बांधून तो २० फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला आहे. तसेच, संत रोहिदास मार्ग येथील भुयारी मार्गाचे पुनर्बांधकाम पूर्ण करून तो १४ जुलै २०२६ रोजी नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापौर रितू तावडे यांनी संपूर्ण कामाचा आढावा घेताना समाधान व्यक्त केले. तसेच, प्रकल्प ठरवलेल्या वेळेत आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुलाची अंतिम कामे (फिनिशिंग) उच्च दर्जाची ठेवावीत, दुभाजकांवर हिरवळ विकसित करावी आणि व्हर्टिकल गार्डन उभारून परिसर अधिक आकर्षक व पर्यावरणपूरक करावा, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
***





















