Home मुंबई ‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल – शालेय...

‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

39
0

_‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे_

*मुंबई, दि. २ | MAI MEDIA 24*

– _शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य_
– _वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश_

राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावे. यासाठी राज्यभर *‘चला शाळेत जाऊया’* हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा *शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे* यांनी केली.

मुंबईतील बालभवन येथे आयोजित *‘शिक्षण संवाद’* या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्यासह सर्व संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

*मंत्री भुसे म्हणाले —*

> “बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचे प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसले पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ‘ज्ञानमंदिरांचे सशक्तीकरण’ ही सामूहिक जबाबदारी आहे.”

*चार दिवसांचा विशेष दौरा:*

राज्यातील आठही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. अधिकारी ४ दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष मूल्यांकन करतील. सकारात्मक बदल दिसणाऱ्या शाळांना प्रोत्साहन दिले जाईल.

*मूलभूत सुविधांना प्राधान्य:*

शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसराला प्रथम प्राधान्य. रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासाठी *लोकसहभाग* घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

*गुणवत्तेवर भर:*

बालवाटिका ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे नमूद केले.

पोषण आहार, गणवेश आणि विद्यार्थी सुविधांबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसून, निकृष्ट दर्जा आढळल्यास *कठोर कारवाई* करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

*- संपादक शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here