*जालन्यात दलित तरुणावर बैल विक्रीचा आरोप करत शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक, जातीय अत्याचार करणाऱ्यांना अद्दल घडवा – खा. वर्षा गायकवाड*
*भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात गुंडगिरी, फडणवीस सरकारचे मात्र दुर्लक्ष.*
मुंबई, दि. २९ ऑगस्ट..
जालन्यात दलित तरुणावर बैल विक्रीचा आरोप करत मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि त्याला शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे, त्याच्या ११ वर्षांच्या मुलालाही अशीच अमानुष वागणूक देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, या गुंडांना अद्दल घडवावी तसेच जालन्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मे महिन्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली एखाद्या माणसाला मारहाण आणि छळ करण्याचा अधिकार कोणी दिला? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्याचे हे प्रकार वाढत चालले आहेत. ही केवळ एका व्यक्तीला केलेली मारहाण नाही, हा संविधानाने दिलेल्या समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या अधिकारावर हल्ला आहे. जातीय अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली गुंडगिरी थांबवा असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अन्याय अत्याचार वाढले आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सभा घेतलेल्या जागेचे तथाकथित शुद्धीकरण केले जाते, त्याचे जाहीरपणे समर्थनही केले जाते पण भाजपाकडून त्यावर मौन पाळले जाते. ही मनुवादी विकृती देशभर फोफावत चालली आहे. शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यातही ही विकृती डोके वर काढत आहे ही चिंतेची बाब आहे. या विकृत मानसिकतेला कोण खतपाणी घालते हे सर्वांना माहित आहे, पण सरकार मात्र त्याकडे कानाडोळा करत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..




















