Home मुंबई *मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थाने निरोप घेतला*

*मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थाने निरोप घेतला*

14
0

*’डोह’कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली*

मुंबई, दि. ८ : मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थाने निरोप घेतल्याची शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी ऊर्फ ‘श्रीवि’ यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, औदुंबर सारख्या गावातून श्रीविंचा प्रवास सुरु झाला. औदुंबर परिसरावर त्यांचे चिरंतन प्रेम. हेच त्यांचे प्रेम सुक्ष्म निरिक्षणातून ललित लेखनाच्या रुपाने साहित्यात अजरामर झाले. ते खडतर परिस्थितीतून ‘मौज’ या प्रथितयश नियतकालिकाच्या संपादक पदापर्यंत पोहचले. सिद्धहस्त कवी म्हणून आणि ललित लेखनातून त्यांनी वाचक रसिकांचे रंजन केले. मनातल्या उन्हात, डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा या ललित संग्रहांनी मने जिंकली. यातूनच त्यांची डोह कार श्रीवि अशी ओळख निर्माण झाली. मौज च्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदितांना लिहीते केले. यामुळे मराठी वाचकांना सकस, दर्जेदार साहित्यकृतींची मेजवानी मिळाली. श्रीवि कुलकर्णी यांच्या निधनामुळे मराठी साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या मार्गदर्शक अशा व्यक्तिमत्वाला मुकलो आहोत. आम्ही कुलकर्णी यांचे चाहते आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असून, या सर्वांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘डोह’कार श्रीवि तथा श्रीनिवास कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here