- *लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकाबाबत नियोजनाचा आढावा; ६ कोटी लखपती दीदींच्या प्रस्तावावर चर्चा
मुंबई, दि. ५. ऑगस्ट, २०२६: ग्रामविकास विभागाच्या बैठकीत ‘लखपती दीदी’ अभियानाच्या वाढीव लक्षांकाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या ६ कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नियोजन, उद्दिष्टपूर्ती आणि आगामी कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीत राज्यात एक कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. स्वयं सहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
राज्यात आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी घडविण्यात यश मिळाल्याबद्दल या अभियानाशी जोडलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा यंत्रणा, स्वयं सहाय्यता गट, समुदाय संसाधन व्यक्ती आणि संबंधित घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. उर्वरित उद्दिष्टही त्याच जोमाने आणि लोकसहभागातून पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा, महिला बचत गटांचे बळकटीकरण, नवीन महिलांचा समावेश, डिजिटल आजीविका नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण तसेच उत्पन्नवाढीच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘लखपती दीदी’ अभियान अधिक व्यापक आणि परिणामकारकपणे राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
000 00
















