Home उद्योग / शिक्षण वार्ता *श्री. लक्ष्मणराव जोशी : तपस्वी पत्रकारितेचे गुरूतत्व…*

*श्री. लक्ष्मणराव जोशी : तपस्वी पत्रकारितेचे गुरूतत्व…*

12
0

*श्री. लक्ष्मणराव जोशी : तपस्वी पत्रकारितेचे गुरूतत्व…*

तपस्वी आणि निस्पृह पत्रकारितेच्या कालखंडाला जोडणारा एक महत्वाचा दुवा श्री लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनामुळे निखळला आहे. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांना प्रिय असलेल्या उपराजधानी नागपूरनगरीत वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संदर्भांची विपुलता, संपर्कासाठी सर्वांना सदैव उपलब्धता आणि सातत्यपूर्ण लेखनवैविध्य यांचा मिलाफ असणारी लेखणी कायमची थंडावली… तरूणांना लाजवेल अशा उत्साहात ते अगदी अलीकडे म्हणजे वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत लिहित होते. शिक्षक आणि पत्रकार हे कधी निवृत्त होत नसतात असे ते म्हणायचे. विशेष म्हणजे अकोल्यात शिक्षक म्हणूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेले लक्ष्मणराव पुढे पत्रकारितेमध्ये स्थिरावले. नागपूर तरुण भारत, गोमांतक, मुंबई तरुण भारत, लोकशाही वार्ता या वर्तमानपत्रांचे संपादकपद त्यांनी भूषविले. वयाच्या साठी नंतर संपादकपद भूषवित असताना संपादकीय चमुतील तरुणपिढीला प्रोत्साहन देताना त्यांच्यातील उत्साह एखाद्या शिक्षकासारखाच असायचा…

नव्या स्वरुपातील ‘मुंबई तरुण भारत’ चा शुभारंभ मे 2001 मध्ये झाला. मुलाखतीसाठी मी कॉल लेटर, शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे यासह मुंबईत हजर झालो. संपादक लक्ष्मणराव, संचालक दिलीपजी करंबेळकर आणि श्री नायर हे मुलाखत घ्यायला होते. आणीबाणीच्या 25 वर्षपूर्तीनिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे संपादक श्री कुमार केतकर यांचा आणीबाणीची अपरिहार्यता अधोरेखित करणारा लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रविवार ‘मैफल’ पुरवणीत काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता… जिल्हा स्तरीय तरूण पत्रकार आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने श्री कुमार केतकर यांच्या त्या लेखाचा जोरदार प्रतिवाद करणारे माझे पत्र देखील ‘महाराष्ट्र टाइम्स’ मैफल पुरवणीतच त्यानंतर प्रकाशित झाले होते. त्या पत्राचे कात्रण डोळ्यासमोर ठेवतच लक्ष्मणरावांनी माझी मुलखात घेतली. मुलाखत देऊन नाशिकला परतल्यावर पुढील आठवड्यात लक्ष्मणरावांचा फोन आला… नक्की मुंबईला यायची इच्छा असेल तर वृत्तसंपादक नाही पण मुख्य वार्ताहर म्हणून रूजू होऊ शकता, असे त्यांनी सांगितले. मी त्यांचा आदेश स्वीकारत तेव्हा मुंबईत दाखल झालो, ते अद्याप मुंबईतच आहे… नाशिककर ते मुंबईकर, या माझ्या प्रवासाचे अशाप्रकारे करते – करविते ठरले ते हे दोन संपादक… एक ‘डावे’ आणि एक ‘उजवे’ ! असो.

‘मुंबई तरूण भारत’च्या वडाळा येथील कार्यालयात संपादक लक्ष्मणराव सकाळी 10 च्या ठोक्याला हजर असत. सगळ्या वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन… आणि आपण कुठे कमी किंवा जास्त याचा लेखाजोखा तयार करून दुपारी 12 वाजता त्यांच्या केबिन मध्ये संपादकीय विभागाची मीटिंग. शिवाय पाने छपाई साठी वेळेमध्ये गेली नसल्यास ती चिकित्सा हा पुन्हा वेगळा विषय…या गडबडीत, मी दिलेल्या मथळ्यांची अनेकदा त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केल्याचे प्रसंग अजूनही माझ्या स्मरणात आहेत. ‘शिक्षक वाऱ्यावर…सरकार ओव्हरड्राफ्टवर’, इंडोग्लोब गैरव्यवहार प्रकरण तेव्हा गाजत होते…’प्रहार’ स्तंभाचा याबाबतचा माझा मथळा होता, “सामर्थ्य आहे स्वप्नांचे, जो जी दाखवील तयांचे परंतु आधी लबाडीचे अधिष्ठान पाहिजे”… मालेगाव मधील दंगलप्रसंगीचा मथळा – “शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना अटक होऊ शकते, मग निहालभाईंना का नाही!” याबाबतची त्यांची शाबासकी म्हणजे मोठ्या पुरस्कारसमान वाटायची…

मालेगाव दंगलप्रसंगी मी ‘मुंबई तरूण भारत’ कार्यालयातून मालेगाव मधील पत्रकार मित्र श्री ब्रिजमोहन शुक्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत माहिती घेत दोन दिवस पान एक साठी बातमी तयार केली. संपादक लक्ष्मणराव यांनी विषयाचे महत्व लक्षात घेऊन मला सकाळी फोन केला – आज आमदार निवास मधून ऑफिसला येताना चार दिवस मालेगावला जायच्या तयारीनेच या… कार्यालयात लक्ष्मणरावांची भेट घेऊन मी दुपारी तीनची दादर-नागपूर रेल्वे पकडली. मालेगावमध्ये तेव्हा संचारबंदी होती. पत्रकार जयप्रकाश पवार यांच्या मालेगाव येथील घरी तळ ठोकला. ८-१० भागांची “मालेगाव दंगलनामा” मालिका तरूण भारतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये लक्ष्मणरावांमुळे प्रकाशित झाली. रविवार पुरवणी ‘आसमंत’ यात सुध्दा दंगलीचा परामर्श घेणारा विशेष लेख प्रकाशित झाला. मंगळवारच्या माझ्या ‘प्रहार’ स्तंभात “निहालभाईंनी लादेनभाईंना लिहिलेले काल्पनिक पत्र” वाचकांनी उचलून धरले. संपादकांची पुन्हा शाबासकी मिळाली.संपादकीय विभागातील एखाद्या सहकाऱ्याकडे एखादा विषय सोपवल्यावर संपादक लक्ष्मणराव त्या सहकाऱ्याला त्या विषयाच्या विविध पैलूंचा परामर्श घेण्यास भाग पाडत असत…

संपादकीय विभागातील सहकाऱ्यांचे पंख छाटणाऱ्या संपादकांचा सर्वकालीन सुकाळ असताना सर्वश्री लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक, मिलिंद गाडगीळ तत्पूर्वी सुरेश अवधूत असे सहकाऱ्यांना प्रोत्साहन आणि मुक्त वाव देणारे संपादक मला लाभले, हे माझे भाग्यच…

सन २००२-०३ मध्ये नाशिक येथे सिंहस्थपर्व असताना नाशिक या जन्मगावी वृत्तसंकलनासाठी त्यांनी मला पाठविले. यावेळी चेंगराचेंगरीची एक दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेवरचा अग्रलेखही त्यांनी माझ्याकडून लिहून घेतला होता…

विधानमंडळाच्या सेवेत मी आल्यावर नागपूर अधिवेशनकाळात ते आणि श्री सुधीर पाठक यांच्याकडे भेट आणि गप्पा हा ठरलेला कार्यक्रम … वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित “ अजातशत्रू ( दिवंगत श्री. रा. सू गवई स्मृतिग्रंथ), “भूमिपुत्र” (दिवंगत श्री भाऊसाहेब फुंडकर स्मृतिग्रंथ) यामध्ये श्री लक्ष्मणराव जोशी यांनी बहुमूल्य योगदान दिले. कामकाजातील त्यांच्या शिस्तीचा अनुभव यावेळी संपूर्ण संपादक मंडळाने घेतला. विधानपरिषद शतक महोत्सवप्रसंगी आयोजित नागपूर येथील कार्यक्रमातही ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

फेसबुकवरील माझ्या लिखाणाला ते नेहमीच दाद द्यायचे. हे लेख तुम्ही पुस्तक रूपात प्रकाशित करा आणि त्या कार्यक्रमाला मला अवश्य बोलवा, असे ते कायम सांगायचे. ते हयात असताना या फेसबुक पोस्ट आणि अन्य लेखांचे पुस्तक स्वरुपात संकलन प्रकाशित होऊ शकले नाही याची खंत मला आता कायम राहील… फेसबुकवरील माझ्या पोस्टवर त्यांच्या पुस्तकप्रकाशनाचा आग्रह धरणाऱ्या कॉमेंट्स मला यापुढे कायम अस्वस्थ करत राहतील… ज्येष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मणराव जोशी यांना भावपूर्ण आदरांजली…

– निलेश मदाने
nilmadane72@gmail.com
मंगळवार, दिनांक 28 जुलै, 2026

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here