Home मुंबई पोलीस दलात १६ हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती करा, अपुऱ्या पोलीस दलामुळे...

पोलीस दलात १६ हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती करा, अपुऱ्या पोलीस दलामुळे कायदा सुव्यवस्था चिंताजनक – खासदार वर्षा गायकवाड

13
0

पोलीस दलात १६ हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती करा, अपुऱ्या पोलीस दलामुळे कायदा सुव्यवस्था चिंताजनक – खासदार वर्षा गायकवाड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार-खासदार खरेदी व पक्ष फोडाफोडीतून वेळ काढून गृहविभाग सक्षम करण्यावर लक्ष द्यावे.

मुंबई, दि. ३० जुलै ..

मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलाला एक वेगळी ओळख आहे पण भाजपा महायुतीच्या काळात पोलीस दलाची प्रतिमा अत्यंत खालावली आहे. राज्याचे गृहमंत्रीच सक्षम नसतील तर पोलीस दल तरी सक्षम कसे राहिल, म्हणूनच मुंबईसह राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे आधीच पोलिसांची नाच्चकी होत असताना पोलीस दलातील अपुरी संख्या ही सुद्धा कायदा सुव्यवस्था ढासळण्याचे एक महत्वाचे कारण आहे. राज्यात तब्बल १६ हजार पोलिसांची पदे रिक्त आहेत, ही पदे कालबद्ध कार्यक्रम आखून भरा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असल्याचे दावे भाजपा महायुती सरकार करत आहे पण वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. पोलीस दलात तब्बल १६ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. एकिकडे गुन्हेगारीत वाढ होत आहे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले आहेत, मुंबईतही महिला सुरक्षित राहिलेला नाहीत. घरात व घराबाहेरही महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सायबर गुन्ह्यांचा आलेख उंचावत आहे, वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आहे. गुन्हेगारीत महाराष्ट्राचा नंबर देशात दुसरा आहे हे चिंताजनक आहे, तर दुसरीकडे पोलीस दलच तीव्र मनुष्यबळाच्या कमतरतेशी झुंजत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर १२ ते १४ तास सक्तीचे काम लादून कायदा आणि सुव्यवस्था टिकवता येणार नाही.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्रीही आहेत पण पक्ष फोडाफोडीतून व आमदार खासदार खरेदीतून त्यांना गृहविभागाकडे लक्ष देण्यास वेळ नाही व त्यांना गृहविभागही सोडवत नाही. पोलीस दलाचे आधुनिकीकरण केवळ कागदावर असून पोकळ घोषणा दिल्या जात आहेत. १६ हजार रिक्त पदे हा केवळ कागदावरील आकडा नाही, तर तो महाराष्ट्राच्या सुरक्षेवरील एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. सरकारने ही रिक्त पदे तातडीने भरून काढावी आणि पोलीस दलाला खऱ्या अर्थाने सक्षम बनवा असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here