Home मुंबई *हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’*

*हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’*

8
0

*महायुती सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे सरकार*

*अण्णाभाऊंच्या समतेचा संदेश जगभर पोहोचवणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*३०० कोटींच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न*

*अण्णाभाऊ साठे यांचा २० मीटर उंच कांस्य पुतळा उभारणार*

*’फकिरा’वरील जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प*

*UPSC-MPSC मार्गदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सुविधा उभारणार*

मुंबई, दि. ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक ‘ज्ञानपीठ’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती सरकार दिलेला प्रत्येक शब्द पाळते आणि या प्रकल्पासाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ठाम ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

घाटकोपर येथे मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) मार्फत उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या महत्त्वाकांक्षी ३०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

संशोधन, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणारे हे केंद्र अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, संजय शिरसाट, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार संजय दिना पाटील, आमदार राम कदम, दिलीप लांडे, मिहीर कोटेचा, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईक कविताबाई साठे, सचिन साठे, आरती साठे आणि विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या कर्मभूमीत त्यांच्या विचारांचे संवर्धन करणाऱ्या या भव्य प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. हे महायुती सरकारच्या वचनपूर्तीचे पहिले पाऊल असून, दिलेला शब्द कृतीत उतरविण्याचा हा क्षण आहे.

अण्णाभाऊंवरील कवितेचा उल्लेख करत त्यांनी, “तुझ्या लेखणीची धार जशी तलवारीची पाती… तू सोन्यासारखी केलीस कष्टकऱ्यांच्या मेहनतीची माती,” या ओळी उद्धृत केल्या आणि अण्णाभाऊ हे मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजाचे दैवत असल्याचे सांगितले.

घाटकोपर ही अण्णाभाऊंची कर्मभूमी असल्याने याच भूमीत त्यांचे स्मारक आणि संशोधन केंद्र उभे राहणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठिकाणी यापूर्वी भेट देऊन अण्णाभाऊंच्या निवासस्थानाला अभिवादन केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

“आपण अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतो; मात्र आजचे भूमिपूजन हे केवळ एका इमारतीचे नाही. अण्णाभाऊंच्या विचारांचे बीज नव्या पिढीत रुजविण्याचा हा संकल्प आहे. हा प्रकल्प दगडांचे स्मारक न राहता सामाजिक परिवर्तनाचे इंजिन ठरेल,” असे शिंदे म्हणाले.

या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ३०० कोटींची तरतूद केली असून, आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पात २० मीटर उंचीचा अण्णाभाऊ साठे यांचा कांस्य पुतळा, त्यांच्या गाजलेल्या ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प, आधुनिक ग्रंथालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, UPSC-MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन, मुलांसाठी डिस्कव्हरी झोन यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.

या केंद्रातून संशोधनालाही चालना मिळेल. अण्णाभाऊंचे विचार पुस्तकापुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जगभर पोहोचतील. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतून नवे अण्णाभाऊ घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा वारसा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शायरी आणि चळवळीच्या माध्यमातून पुढे नेला. शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांचा आवाज त्यांनी जगभर पोहोचवला.
“पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा अण्णाभाऊंचा विचार महाराष्ट्राच्या विकासाचे तत्त्वज्ञान असल्याचे शिंदे म्हणाले.

राज्य सरकार कष्टकरी, शेतकरी, वारकरी, कामगार आणि वंचितांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अण्णाभाऊंनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्याच विचारातून सरकारने गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला असून रमाबाई आंबेडकर नगर, कामगार नगरसह विविध भागांतील झोपडपट्टीधारकांसाठी सुसज्ज घरे उभारण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकार केवळ इमारती उभारत नाही, तर सर्वसामान्यांचे आयुष्य बदलत आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करणे हे मोठे आव्हान होते. मात्र एसआरएने संवेदनशीलतेने काम करत २४१ पात्र कुटुंबांचे सन्मानाने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. विशेष शिबिरे घेऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. एकाही पात्र कुटुंबावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबांचे, एसआरएचे अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

“आधी माणूस आणि नंतर प्रकल्प” हा सरकारचा दृष्टिकोन असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, सरकारसाठी विकास म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीट नव्हे, तर माणसाचा सन्मान आहे. कोणताही विकास प्रकल्प लोकांवर लादला जात नाही. लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या संमतीनेच विकासाची वाटचाल केली जाते.

स्थानिक आमदार राम कदम तसेच सर्व खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, क्लस्टर विकास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ यांचा उल्लेख करत मुंबईतील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला सन्मानाचे घर मिळवून देणे हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर परिवर्तनाचे शिल्पकार होते. जातिभेद, अस्पृश्यता, कामगारांवरील अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा प्रत्येक संघर्षात ते सामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांच्या लेखणीतून आणि शायरीतून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा लाखो लोकांना मिळाली, असे शिंदे म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उल्लेखाचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) ज्या पद्धतीने हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहे, त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) सामाजिक न्याय, संशोधन आणि कौशल्य विकासाचे प्रभावी केंद्र म्हणून उभी राहत आहे. या माध्यमातून हजारो तरुणांना नवी दिशा मिळेल आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा अधिक व्यापकपणे पुढे नेला जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच अण्णाभाऊंच्या मूळ गावी वाटेगाव येथे ५० कोटींच्या निधीतून भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

“महाराष्ट्र वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आमचा अजेंडा केवळ विकास नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महामानवांची प्रेरणा आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करून महाराष्ट्राला अधिक प्रगत बनवू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

भाषणाच्या शेवटी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव” या क्रांतिकारी ओळींचा उल्लेख करत सामाजिक न्यायाचा लढा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
समारोप करताना त्यांनी समाजसेवकांना संदेश देताना म्हटले, “समाजसेवा करताना वाटेत कितीही काटे आले, तरी एकच आदर्श डोळ्यांसमोर ठेवा… अण्णाभाऊ साठे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here