अकार्यक्षम शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी; अन्यथा तरुण सत्तेतून खाली खेचणार: माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा
मुंबई: सोमवार दिनांक 20/7/260आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दिल्लीत करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज आणि आंदोल चिरडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न म्हणजे इंग्रज राजवटीची आठवण करून देणारा आहे. या क्रूर, निष्ठूर आणि हुकूमशाही सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने आणि जोरदार आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन पक्षाचे मुंबई अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले आणि वैभव गाढवे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात गगनभेदी घोषणा देत मुंबई विद्यापीठ परिसर दणाणून सोडला.
विगत २० दिवसांपासून अन्नत्याग करून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी, त्यांना हुकूमशाही पद्धतीने अटक करण्यात आली. तसेच दिल्लीत संसदेवर निघालेला विराट मोर्चा पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचा नीच प्रयत्न सरकारने केला. स्वतःची चूक मान्य न करता उलट लोकशाही मार्गाने आवाज उठवू न देणाऱ्या या ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झालेल्या सरकारचा आंदोलकांनी तीव्र शब्दात निषेध केला.
आंदोलनाचे नेतृत्व करताना मुंबई अध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे म्हणाले,
”शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठ्या चालवणं हा लोकशाहीचा खून आहे. लोकशाहीत रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस आणि तरुण हीच सर्वात मोठी शक्ती असते, हे सरकार विसरत चालले आहे. शिक्षण क्षेत्राचा संपूर्ण बट्ट्याबोळ करणाऱ्या अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. जर सरकारने शहाणपण दाखवून राजीनामा घेतला नाही, तर हे आंदोलनच या सरकारच्या शेवटाची सुरुवात ठरेल. केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या हुकूमशाही सरकारला देशातील तरुण सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.”
या आंदोलनात मुंबई विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी, युवक प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने लोकशाहीची गळचेपी थांबवावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले व वैभव गाढवे यांनी दिला.



















