*घरबसल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनांना पाठिंबा देणाऱ्या उबाठा गटावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात*
*’तुम लढो, हम कपडे संभालते हैं’ म्हणत हिंदुत्व, मोदी सरकार, पेपर लीक आणि एनडीएच्या वैचारिक भूमिकेवर मांडली आपली सविस्तर भूमिका*
मुंबई, ता. 14 : “बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय, अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अवस्था झाली आहे. स्वतः आंदोलनात उतरण्याचे धाडस नाही, पण ‘तुम लढो, हम कपडे संभालते हैं’ या भूमिकेतून घरबसल्या आंदोलनांना पाठिंबा देत राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे,” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
दिल्लीतील जंतरमंतर येथील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उबाठा गटाने दिलेल्या पाठिंब्यावरून शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी हिंदुत्व, राम मंदिर, कलम 370, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, विरोधकांचे राजकारण, एनडीएची भूमिका, पेपर लीक आणि राज्यातील विविध घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या पाठिंब्याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, “हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन झाले की त्याला पाठिंबा देण्याची त्यांची सवय आहे. मात्र स्वतः कधीही रस्त्यावर उतरून नेतृत्व करत नाहीत. नेहमी घरातूनच आंदोलनांना पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांची भूमिका ‘तुम लढो, हम कपडे संभालते हैं’ अशीच राहिली आहे.”
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे गट सातत्याने श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश यांची उदाहरणे देत देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्या देशांतील आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली होती. लोकांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र भारताची परिस्थिती त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
मोदी सरकारने 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले असून 32 कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे भारताची तुलना श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळशी करणे हा केवळ राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
“विरोधकांचा उद्देश आंदोलनांच्या माध्यमातून देशात आणि राज्यात अस्थिरता निर्माण करणे, कायदा-सुव्यवस्था बिघडवणे आणि लोकांना रस्त्यावर उतरवणे हा आहे. मात्र भारताची संस्कृती, लोकशाही आणि परंपरा इतक्या मजबूत आहेत की असे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत,” असा दावा त्यांनी केला.
यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, मोठमोठे घोटाळे आणि अपयश देशातील युवकांनी पाहिले आहे. त्यामुळे 2014 नंतर झालेला विकास, रोजगाराच्या संधी आणि देशाची बदललेली प्रतिमा युवकांना दिसत आहे. त्यामुळे आजही देशातील युवा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचे शिंदे म्हणाले.
गरीब, शेतकरी, महिला, कष्टकरी आणि युवकांसाठी केंद्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. विरोधक मात्र लोकांना भडकवून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा देश अशा राजकारणाला कधीही बळी पडणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधताना शिंदे म्हणाले, “आंदोलन इतकेच योग्य वाटत असेल, तर स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी का जात नाहीत? नेहमी घरातूनच पाठिंबा का देतात? कोणत्या वेळी कोणते आंदोलन करायचे, याचेही त्यांना भान राहिलेले नाही.”
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकले आणि आता रामरक्षा म्हणत आहेत. ‘जो राम का नाही, वो किसी काम का नाही’ हे आता त्यांना समजले आहे. त्यामुळे आज रामरक्षा म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी सोडले, त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व संपले,” असा घणाघात त्यांनी केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणाऱ्यांसोबत सत्तेसाठी हातमिळवणी करताच उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे हिंदुत्वच सोडले, असा आरोपही शिंदे यांनी केला.
देशाच्या पंतप्रधानांवर सातत्याने आरोप केले जात असले, तरी नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारले, कलम 370 हटवले आणि बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पूर्ण केली. आता विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. म्हणूनच ते पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एनडीएसोबतच्या युतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “आमची युती ही सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी झालेली नाही. ती पूर्णपणे वैचारिक युती आहे. समान विचारधारेच्या आधारावर आम्ही देश मजबूत करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही कधीही बार्गेनिंग केले नाही आणि करणारही नाही.”
शिवसेनेच्या खासदारांच्या अपात्रतेबाबत विरोधकांनी दिलेल्या पत्रावर बोलताना त्यांनी सांगितले की, त्या पत्राला आमच्या खासदारांनी केराची टोपली दाखवली आहे. लोकशाहीमध्ये कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया महत्त्वाची असते. लोकसभा अध्यक्षांकडे सहा खासदारांनी नियमानुसार अर्ज सादर करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे त्या पत्राचा कोणताही परिणाम होणार नसून तो केवळ केविलवाणा राजकीय प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
ठाण्यातील बेकायदा बॅनरप्रकरणी आपण स्वतः आयुक्तांना दूरध्वनी करून सर्व बेकायदा बॅनर तातडीने हटवण्याचे आदेश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. “एकही बेकायदा बॅनर ठेवू नका. कायद्याबाहेर जाऊन कोणालाही संरक्षण देऊ नका. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. कोणतीही अनुचित घटना घडू देऊ नका,” अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. “मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून अनेक लोक विविध कामांसाठी भेटायला येतात. प्रत्येक भेटीत राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नये,” असेही ते म्हणाले.
पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. “महाराष्ट्रात टीईटीचा पेपर लीक करण्याचा कट आमच्या पोलिसांनी वेळेत उधळून लावला. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. देशाच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कायदा लागू व्हावा आणि त्यांना सहज जामीन मिळू नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात टीईटी, सीईटी आणि आरोग्य भरतीसह तीन वेळा पेपर लीकच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधी यांनी टीका करण्यापूर्वी त्या काळातील घटनांची आठवण ठेवावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
पेपर लीकच्या कोणत्याही घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
शेवटी विरोधकांवर पुन्हा निशाणा साधत शिंदे म्हणाले, “आज विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखा एकही ठोस मुद्दा उरलेला नाही. म्हणूनच ते आंदोलनांच्या माध्यमातून गोंधळ निर्माण करण्याचा, लोकांना भडकवण्याचा आणि हिंदुत्वाचा आव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता त्यांचे राजकारण ओळखून आहे. देश आणि महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर असून विरोधकांचे हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत.”


















