*राममंदिरातील चोरी… शिक्षा होईल; पण समाज बदलेल का?*
— *सचिन देव*
आज अनेक विचारशील तरुणांचे धर्म, श्रद्धा आणि जीवनमूल्यांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. आजचा तरुणनिष्ठ तर्क आणि विज्ञाननिष्ठ तो स्वीकारणे ही गोष्ट आंधळेपणाने नाही; त्याला प्रत्येक गोष्टीमागील तर्क आणि अनुभव घ्यायचा असतो. योग्य उत्तरे न गुजरात संभ्रम वाढतो आणि श्रद्धा डळमळते.
अशा वेळी त्यांच्या प्रश्नांना तर्कसुसंगत, अनुभवाधिष्ठित आणि समाधानकारक उत्तरे मिळाली, तर प्रभू श्रीरामांनी दाखविलेल्या सत्य, धर्म, कर्तव्य आणि मर्यादेच्या मार्गाने चालण्यास तो नक्कीच प्रेरित होईल. विवेकाने दृढ झालेली श्रद्धाच चिरंतन टिकते. अशी विवेकपूर्ण श्रद्धा जागृत करणे आणि जीवनमूल्यांची दिशा देणे, ही मंदिरांची व धार्मिक-सामाजिक संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे राम फक्त केवळ मंदिरात आहे का?
राम (भगवंत) मंदिरात आहे, यात शंका नाही; पण तो केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही. तो प्रत्येक क्षणी आपल्या सोबतही आहे. तोच आपल्या हृदयाला अखंड धडधडत ठेवतो, शरीरात रक्तप्रवाह सुरू ठेवतो, जिभेला ओलावा देतो आणि प्रत्येक श्वासाला जीवन देतो. आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण त्याच्या उपस्थितीनेच अर्थपूर्ण आहे.
मंदिर हे साध्य नाही; ते साधन आहे. भगवंताला दगडी वास्तूमध्ये बंदिस्त करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या अखंड उपस्थितीची अनुभूती जागृत करण्यासाठी मंदिर आहे. तेथे जाऊन मन शुद्ध होते, विचारांना दिशा मिळते आणि “तो माझ्याबरोबर चोवीस तास आहे” ही जाणीव अधिक दृढ होते.
प्रभू श्रीरामांना आपण केवळ पूजनीय देव म्हणून नव्हे, तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून वंदन करतो. सत्य, धर्म, कर्तव्य, करुणा, त्याग आणि मर्यादा यांचे त्यांनी आयुष्यभर पालन करून आदर्श मानवी जीवन जगून दाखवले. म्हणूनच त्यांचे जीवन मनुष्याला देवत्वाकडे नेणारी प्रेरणा ठरते. रामाचे स्मरण म्हणजे केवळ पूजा नव्हे; तर त्यांच्या आदर्शांना आपल्या विचारात, आचरणात आणि नात्यांत उतरवण्याचा प्रयत्न होय.
याच विचाराला आपल्या उपनिषदांनी अधिक गहन अर्थ दिला आहे “यस्य निःश्वसितं वेदाः।”
(अर्थ – विचार भगवंताचे श्वास आहेत )
जसा श्वास हा जीवनाचा आधार असतो, तसे वेद हे भगवंताच्या विचारांचे, सत्याचे, धर्माचे आणि जीवनमूल्यांचे जिवंत स्वरूप आहेत. म्हणून मंदिरात केवळ मूर्ती असणे पुरेसे नाही; मंदिरातून भगवंताच्या विचारांचा श्वास समाजात वाहिला पाहिजे. वेदांचा, संतांचा आणि धर्मतत्त्वांचा प्रकाश समाजजीवनात पोहोचला, तरच माणसाच्या जगण्याचा कणा ताठ राहील, संघर्षाशी लढण्याचे नैतिक बळ मिळेल आणि भेदभावाच्या भिंती आपोआप कोसळतील.
म्हणूनच मंदिर हे केवळ पूजा अर्चेचे स्थान न राहता अध्ययन, चिंतन, प्रश्नोत्तर, संवाद, संस्कार आणि समाजप्रबोधनाचे केंद्र बनले पाहिजे. तेथे शास्त्रांचा अभ्यास व्हावा, संतवाङ्मय समजावून सांगितले जावे आणि विशेषतः तरुणांच्या प्रश्नांना तर्क, अनुभव आणि प्रेमाने उत्तरे दिली जावीत.
आज मंदिरे वाढली आहेत; पण भगवंताचे विचार समाजात किती उतरले? मंदिर असे असावे की जिथे जात-पात, श्रीमंती-गरीबी, भाषा-प्रांत यांचे भेद विसरून सर्वजण एका पंगतीत, एका भावनेने एकत्र बसतील, विचारांची देवाणघेवाण करतील, शास्त्रांचा अभ्यास करतील आणि जीवनमूल्यांचा स्वीकार करतील. मंदिराची महानता त्याच्या उंच कळसावर नव्हे, तर तेथून बाहेर पडणाऱ्या सुसंस्कारित, विवेकी, संवेदनशील आणि चारित्र्यसंपन्न माणसांवर ठरते.
राजकीय व्यवस्था समाजाला शिस्त लावू शकते, कायदा गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो; पण माणसाच्या अंतःकरणात सद्सद्विवेक जागवणारा, जीवनाला नैतिक दिशा देणारा आणि समाजाला खऱ्या अर्थाने बदलणारा राम प्रत्येकाच्या हृदयात जागा झाला, तरच कायमस्वरूपी परिवर्तन घडेल.
रामाचे मंदिर उभारणे ही संस्कृतीची जागा आहे; पण रामतत्त्व आपल्या अंतःकरणात जागृत करून ते आपले आचरण जगणे, ही त्या संस्कृतीची खरी परिपूर्ती आहे.
(*लेखक आध्यात्मिक सामाजिक पत्रकार*)
॥ हरी ॐ ॥



















