Home उद्योग / शिक्षण वार्ता एका दिवसाच्या निकालापलीकडे… शिक्षणाला न्याय देणारी वाट असावी

एका दिवसाच्या निकालापलीकडे… शिक्षणाला न्याय देणारी वाट असावी

38
0

एका दिवसाच्या निकालापलीकडे… शिक्षणाला न्याय देणारी वाट असाव

शेतकरी संपूर्ण वर्षभर शेतात राबतो. उन्हाची झळ, पावसाची अनिश्चितता, वाऱ्याचा मारा आणि मातीशी चाललेला त्याचा अखंड संवाद या सगळ्याचा शेवट एका दिवसाच्या कापणीत होतो. पण त्या एका दिवसावर कोणीही त्याच्या वर्षभराच्या कष्टांचे मोजमाप करत नाही. कारण पीक हे एका दिवसाचे नसते; ते प्रत्येक दिवसाच्या घामाचे संचित असते.
मग विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र आपण वेगळा न्याय का लावतो?
अकरावी-बारावीतील दोन वर्षांचा अभ्यास, शेकडो तासांचे वाचन, प्रयोगशाळेतील प्रयोग, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांची धडपड, अपयशातून उभे राहण्याची हिंमत आणि सातत्याने केलेला सराव या सगळ्याचा हिशेब आपण केवळ तीन तासांच्या प्रवेश परीक्षेत मांडतो. त्या एका दिवसातील यश म्हणजे भविष्य उजळते आणि एखादी चूक झाली तर दोन वर्षांची मेहनत क्षणात गौण ठरते. ही शिक्षणव्यवस्थेची सर्वात मोठी विसंगती आहे.
याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा – नीट आणि अभियांत्रीकी प्रवेश परीक्षा जेई प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांना सुमारे पन्नास टक्के ग्राहय – वेटेज देण्याची उच्चस्तरीय ९ सदस्याच्या समितीची शिफारस समोर आली आहे. हा अंतिम निर्णय नसला, तरी या प्रस्तावाने शिक्षणाविषयीचा एक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. विद्यार्थ्याचे मूल्यमापन एका दिवसाने व्हावे की संपूर्ण शैक्षणिक प्रवासाने?
आजची शिक्षणव्यवस्था अनेकदा विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मंदिरात नव्हे, तर गुणांच्या बाजारात उभे करते. अभ्यासाचा अर्थ समजून घेण्यापेक्षा प्रश्नसंच पाठ करणे महत्त्वाचे ठरते. जिज्ञासेची जागा ‘रँक’ घेते आणि पुस्तकांच्या सुगंधावर उत्तरपत्रिकेचा दबाव मात करतो. शिक्षण ही नदी न राहता ती स्पर्धेची शर्यत बनते. त्या शर्यतीत प्रत्येक जण धावत असतो; पण कुठे पोहोचायचे आहे, हे अनेकांना माहीतच नसते.
यामुळे कोचिंग संस्कृतीनेही अभूतपूर्व विस्तार घेतला. अनेक विद्यार्थ्यांसाठी शाळा केवळ उपस्थितीची जागा राहिली आणि खरे शिक्षण कोचिंग संस्थांच्या वर्गखोल्यांत स्थलांतरित झाले. लाखो रुपयांच्या फी, अंतहीन टेस्ट सिरीज, दिवसाचे बारा-बारा तास अभ्यास आणि प्रत्येक चाचणीनंतर स्वतःची इतरांशी तुलना या चक्रात विद्यार्थी अडकत गेला. ज्ञानाची तहान कमी झाली; गुणांची भूक वाढत गेली.
या व्यवस्थेचा सर्वात मोठा बळी ठरला तो विद्यार्थ्यांचा मानसिक समतोल. एका दिवसाच्या परीक्षेने आयुष्य ठरणार, ही भावना अनेकांच्या मनात एवढी खोलवर रुजली की परीक्षेपेक्षा परीक्षेची भीती मोठी झाली. काही जण उत्कृष्ट तयारी असूनही तणावामुळे अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. काहींना आजारपणाने साथ दिली नाही. काहींच्या हातून किरकोळ चुका घडल्या. यातून विद्यार्थी आत्महत्या वाढत आहेत. मग प्रश्न असा आहे, एका दिवसातील अडथळ्यामुळे दोन वर्षांच्या परिश्रमांना शून्य ठरवणे कितपत न्याय्य आहे?
बारावीच्या गुणांना महत्त्व मिळाले, तर विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गाकडे, शिक्षकांकडे आणि पाठ्यपुस्तकांकडे वळावे लागेल. शाळेतील प्रत्येक तास महत्त्वाचा ठरेल. अभ्यास हा फक्त प्रवेश परीक्षेसाठी नसून ज्ञानासाठी आहे, ही जाणीव पुन्हा बळकट होईल. सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मूल्य वाढेल. रोज केलेली छोटी प्रगतीही अंतिम यशाचा भाग बनेल.
समितीने सुचवलेले इतर बदलही तितकेच दूरदृष्टीचे आहेत. प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत करणे, वर्षातून एकापेक्षा अधिक संधी देणे आणि भविष्यात अनुकूल संगणकीय परीक्षा पद्धती स्वीकारणे हे बदल शिक्षण अधिक विद्यार्थीकेंद्रित करण्याची दिशा दाखवतात. आयुष्याला दुसरी संधी मिळते, तर परीक्षेलाही ती मिळायला हरकत नाही.
तथापि, या प्रस्तावासमोर काही गंभीर प्रश्नही उभे राहतात. देशभरातील विविध शिक्षण मंडळांच्या मूल्यमापनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही मंडळांत गुण सहज मिळतात, तर काही ठिकाणी काटेकोर मूल्यमापन होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा, यासाठी गुणांचे वैज्ञानिक समायोजन आणि राष्ट्रीय दर्जाचे निकष विकसित करावे लागतील. अन्यथा सुधारणा करण्याच्या प्रयत्नातून नवी विषमता निर्माण होऊ शकते.
शिक्षण म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचे कौशल्य नाही. शिक्षण म्हणजे विचार करण्याची क्षमता, जिज्ञासा, संवेदनशीलता, संयम आणि सातत्य यांची जोपासना. प्रवेश परीक्षा विद्यार्थ्याची बौद्धिक तयारी मोजू शकते; पण त्याच्या दोन वर्षांच्या शिस्तीचे, परिश्रमांचे आणि चिकाटीचे मोल बारावीचे गुण अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात. म्हणूनच या दोन्हींचा समतोल साधणारी व्यवस्था ही अधिक न्याय्य ठरू शकते.
समाजाला केवळ गुणवान नव्हे, तर गुणवंत माणसे हवी आहेत. डॉक्टर आणि अभियंते केवळ प्रश्न सोडवणारे नसावेत; ते संवेदनशील, जबाबदार आणि जीवनमूल्यांची जाण असलेले नागरिकही असावेत. अशा व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी एका दिवसाच्या परीक्षेत होत नाही; ती वर्षानुवर्षांच्या सातत्यपूर्ण शिक्षणातून घडते.
शिक्षण हे शंभर मीटरची धावण्याची शर्यत नाही; ती आयुष्यभर चालणारी मॅरेथॉन आहे. मॅरेथॉनचा विजेता शेवटच्या शंभर मीटरवर ठरत नाही, तर प्रत्येक पावलावर साठलेल्या चिकाटीने घडतो. विद्यार्थ्यांच्याही आयुष्याचा निर्णय एका दिवसाच्या तीन तासांनी नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या प्रयत्नांनी व्हायला हवा.
कदाचित म्हणूनच हा प्रस्ताव केवळ प्रवेश प्रक्रियेतील बदल नाही; तो शिक्षणाच्या न्याय, समतोल आणि मानवी मूल्यांकडे परत जाण्याचा प्रयत्न आहे. जर या सुधारणेची अंमलबजावणी पारदर्शक, वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक पद्धतीने झाली, तर ती केवळ गुण मोजणारी व्यवस्था बदलणार नाही ती विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे पाहण्याची आपली दृष्टीही बदलून टाकेल.
कारण शिक्षणाचा खरा निकाल गुणपत्रिकेत लागत नाही; तो विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वात, विचारांत आणि आयुष्य घडविण्याच्या क्षमतेत उमटत असतो. आणि त्या निकालासाठी एका दिवसाची परीक्षा कधीच पुरेशी नसते.
***
राहुल हरिभाऊ इंगळे पाटील – मो. ९८९०५७७१२८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here