मुंबई – मुंबईत अनेक धोकादायक इमारती असून तेथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या धोकादायक इमारतींबाबत शासनाने निर्देश देऊन त्वरित उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना केली.
पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, वाळकेश्वर येथील बाबुलनाथ रोडवरील गावदेवी परिसरात म्हाडाच्या सेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग अचानक कोसळला. जवळच्याच पेट्रोल पंपावर काम करणारे रस्त्यावरून जाणारे संतोष रामचंद्र भारस्कर (५१) यांच्यावर तो ढिगारा पडला. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वत्र पाऊस सुरु झाला असून आपण समाधान व्यक्त करतोय. मात्र हाच पाऊस सुरु झाला कि काही घरांतील लोकांना झोप लागत नाही. १३,८०० इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. या घटनेची सर्व माहिती सभागृहासमोर आली पाहिजे. ही इमारत धोकादायक घोषित केली आहे का? तेथील लोकांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था म्हाडाने केली होती का? इमारतीच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाने काही विचार केला होता का? ही माहितीही मिळायला हवी. तसेच या जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या लोकांसाठी म्हाडा व राज्य सरकार युद्ध पातळीवर काय करणार? हेही समोर आले पाहिजे. अशा अनेक इमारती असून कुठल्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत शासनाने निर्देश देऊन त्वरित उपाययोजना करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले. यावर उपसभापती सचिन अहिर यांनी शासनाने तातडीने कारवाई करावी, असे निर्देश दिले.
00000


















