Home मुंबई *हवामान जोखीमग्रस्त तालुका म्हणून* *पोलादपूर तालुक्याचा समावेश करणार का?* *भाजपा...

*हवामान जोखीमग्रस्त तालुका म्हणून* *पोलादपूर तालुक्याचा समावेश करणार का?* *भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांची विचारणा*

39
0

मुंबई – आज विधान परिषदेत सदस्य विवेक कोल्हे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) बाबत लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत सहभागी होत भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हवामान जोखीमग्रस्त तालुका म्हणून पोलादपूर तालुक्याचा समावेश शासन करणार का?, अशी विचारणा केली.

आमदार दरेकर म्हणाले की, पोक्रा योजनेचा पहिला टप्पा विदर्भ, मराठवाडा, नाशिक, अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांपुरताच मर्यादित होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही गावे, जिल्हे यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातील काही गावे व तालुके या योजनेत समाविष्ट होऊ शकतात. रायगड पूर्णपणे दुष्काळी जिल्हा नाही. कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, पोलादपूर यांसारख्या भागात अतिवृष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते. पोलादपूर तालुका पूर्णपणे डोंगराळ आहे. तेथील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता कमी आहे. हा तालुका हवामान जोखीमग्रस्त आहे. पोक्रा योजनेत हवामान बदलाची जोखीम हा निकष आहे. सावित्री नदीचे खोरे व डोंगर उताराच्या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर माती वाहून जाते. त्यामुळे उत्पादकताही कमी होते. शेतकऱ्यांचा खर्चही वाढतो. पोक्रातून या तालुक्यात मृदुसधारण व जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. कोकणसाठी स्वतंत्र हवामान लवचिक शेती मॉडेलची गरज आहे. विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ आहे तर कोकणात अतिवृष्टीचे संकट असते. पोक्रा योजनेच्या पहिल्या टप्प्यात दुष्काळग्रस्त भागांना शासनाने प्राधान्य दिले. मात्र हवामान बदलामुळे कोकणातील रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी भूसखलनामुळे शेतीचे नुकसान होते. तालुका म्हणून पोलादपूर तालुक्याचा २.० यामध्ये समावेश करणार का? तसेच कोकण हवामान लवचिक कृषी आराखडा मंजूर करण्याबाबत शासन भूमिका घेणार का? असा सवाल आ. दरेकर यांनी विचारला.

दरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, अशा प्रकारच्या मागण्या राज्यातील अनेक भागांतून येत आहेत. हा प्रकल्प ७,२०१ गावात सुरू झाला आहे. त्याला जागतिक बँकेने अनुदान दिले असून त्यांच्याशी करारही झालाय. काही अटी आणि शर्ती आहेत. आपण या प्रक्रियेत खूप पुढे गेलो असून अतिरिक्त कुठल्याही गावांचा समावेश करणे आता शक्य नाही. भविष्यात नवीन योजना कार्यान्वित होतील तेव्हा याचा निश्चितपणे विचार करू असे आश्वासन दिले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here