Home मुंबई *शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला* *हिवाळी पाडा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत...

*शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला* *हिवाळी पाडा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद*

46
0

मुंबई, दि. २३ : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा ता. त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रयोगशाळाच ठरत आहे. विशेष म्हणजे ही शाळा सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून वर्षभर सातत्याने विविध शैक्षणिक आणि कौशल्याधारित उपक्रम राबविले जातात, या उपक्रमांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले.

शाळेत शेती, परसबाग, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आणि प्रयोगात्मक शिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शिक्षण अधिक आनंददायी, उपयुक्त आणि जीवनाभिमुख बनले आहे. यावेळी शाळेतील शिक्षक केशव गावित यांच्या उपस्थितीत शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययनाची माहिती घेतली; तसेच विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि ज्ञानवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे व्यवस्थित कापलेले केस, स्वच्छ गणवेश, कापलेली नखे; तसेच स्वच्छ आणि सुंदर शालेय परिसर पाहून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्वच्छता आणि शिस्त या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मूलभूत बाबी असून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, दुर्गम भागातील हिवाळी पाडा शाळेने शिक्षण, स्वच्छता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ शाळा शिस्तबद्ध विद्यार्थी, गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक, प्रशासनाने संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक आहे.

राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे, शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनासोबतच स्वच्छता व शिस्तीच्या सवयी दृढ व्हाव्यात यासाठी अशा प्रकारचे नियमित आढावे आणि संवाद उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here