Home मुंबई वांद्र्यातील गरीब नगर झोपडपट्टीत राडा, दगडफेक

वांद्र्यातील गरीब नगर झोपडपट्टीत राडा, दगडफेक

34
0

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक
परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू केली असून रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे पाडण्यात येत आहेत. दरम्यान या अतिक्रमण कारवाईला मोठा विरोध झाला असून पोलिसांवर बाटल्या, दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ही तोडक कारवाई सुरु असताना कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाकडून सुरु असलेल्या रेल्वे मार्गालगत उभारलेली अनधिकृत घरे, पत्र्याच्या झोपड्या आणि काही व्यावसायिक गाळे हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. कारवाई सुरू होताच अनेक नागरिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. आरपीएफ आणि जीआरपी एकत्रितपणे ही कारवाई करण्यात येत आहे. वांद्र्यातील अतिक्रमण करण्यात आलेली जागा ही रेल्वेच्या मालकीची असून अनेक वेळा नोटिसा देऊनही अतिक्रमण हटवले नव्हते. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर हजारो बेकायदेशीर झोपड्या उभ्या होत्या. राजकीय पाठबळामुळे या कारवाईत खोडा घातला गेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here