Home Uncategorized विसर्जनानंतर श्रीगणेश मुर्तीची पुनर्प्राप्ती आणि वाहतुकीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रमाणित कार्यपद्धती निश्चित*

विसर्जनानंतर श्रीगणेश मुर्तीची पुनर्प्राप्ती आणि वाहतुकीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रमाणित कार्यपद्धती निश्चित*

70
0

*माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेली मार्गदर्शक यांना अनुसरून शास्रोक्त कार्यवाही !

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव आणि इतर उत्सव यासंदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मार्गदर्शक तत्वे यांना अनुसरून मूर्ती विसर्जन पश्चात कार्यवाही करण्यासाठी , बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) ठरवून दिली आहे. या कार्यपद्धतीच्या आधारे मुर्ती विसर्जनपश्चात पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव तसेच इतर सण उत्सव पर्यावरणस्नेही रितीने साजरे होण्यासाठी, माननीय उच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील विविध मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुर्ती विसर्जनाच्या बाबी निश्चित करून देण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती विसर्जित केल्यानंतर त्यांची पुनर्प्राप्ती करणे, नंतर पुनर्प्रक्रिया करणे, त्याच्या शास्रोक्त पद्धती कोणकोणत्या असू शकतात, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे देखील निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याबाबतची कार्यवाही विचाराधीन आहे.

सदर तज्ज्ञ समिती नेमून शिफारसी प्राप्त होणे, त्यांची अंमलबजावणी करणे, हे सर्व घडेपर्यंतच्या कालावधीत, उच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन योग्य रितीने व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure) ठरवून दिली आहे. त्याबाबतचे परिपत्रक महानगरपालिकेच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांना (वॉर्ड) तसेच खात्यांना पाठवण्यात आले आहेत.

प्रमाणित कार्यपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये

*विसर्जित झालेल्या मुर्तींची पुनर्प्राप्ती -*

१) कृत्रिम तलाव / तात्पुरत्या टाकी / जलस्रोत या ठिकाणी विसर्जित झालेल्या सर्व मुर्ती २४ तासांच्या आत गरजेनुसार यंत्राच्या अथवा मनुष्यबळाच्या सहाय्याने बाहेर काढाव्यात (पुनर्प्राप्ती).

२) आवश्यक शक्य तेथे लहान आकाराच्या मुर्ती मनुष्यबळाच्या सहाय्याने पुनर्प्राप्त करता येतील. त्यासाठी संबंधित मनुष्यबळास हात मोजे (ग्लोव्हज), जलसंरक्षक बूट इत्यादी संरक्षक साधने पुरवावीत.

३) मोठ्या आकाराच्या मुर्ती सुव्यवस्थितपणे, सुरक्षितपणे पुनर्प्राप्त करता याव्यात, यासाठी क्रेन सारख्या योग्य संयंत्रांचा उपयोग करावा.

४) पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तींचा योग्यपणे दस्तावेज तयार करण्यात यावा, जेणेकरून त्याची पडताळणी करता येईल.

*पुनर्प्राप्ती पश्चात वाहतूक *

विसर्जनानंतर पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तींची, पुनर्प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या ठिकाणापर्यंत (डायघर, शिळफाटा) वाहतूक करण्यासाठी दर निश्चित करून देण्यात आले आहेत. प्रत्येकी १२ तासांचे सत्र आणि सदर ठिकाणापर्यंतचे अंतर या बाबी लक्षात घेता, शहर विभागासाठी १०० किलोमीटर अंतराकरिता ९,६२८ रुपये; पुर्व उपनगरांसाठी ८० किलोमीटर अंतराकरिता ८,७८८ रुपये आणि पश्चिम उपनगरांसाठी १०० किलोमीटर अंतराकरिता ९,६२८ रुपये असे आधारभूत दर ठरवून देण्यात आले आहेत. या दरांमध्ये वाहन चालक खर्च, कामगार खर्च, इंधन, परिरक्षण खर्च, पथकर (टोल), वाहनतळ, विमा आणि इतर सर्व अनुषंगिक खर्च समाविष्ट करून ते निश्चित करण्यात आले आहेत.

पुनर्प्राप्त केलेल्या मुर्तींची वाहतूक करताना, वाहनामध्ये मुर्ती ठेवणे- उतरवणे ही कामे योग्य रितीने व्हावीत, यासाठी किमान तीन कामगार नेमणे आवश्यक राहणार आहे. या मनुष्यबळाचा खर्च देखील सत्र खर्चात गृहीत धरण्यात आला आहे.

या आधारभूत दरांच्या आधारे संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांकडून आपापल्या स्तरावर निविदा मागवून संस्थेची नेमणूक केली जाणार आहे.

*इतर उपाययोजना*

विसर्जन पश्चात पुनर्प्राप्त केलेल्या मुर्तीमधील अतिरिक्त पाणी व इतर बाबी काढाव्यात, वाहतूक करावयाची वाहने आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ करून नंतर त्यात मुर्ती ठेवाव्यात, वाहनांमध्ये मुर्ती ठेवताना – उतरवताना योग्य ती काळजी घेण्यात यावी, वाहनांमध्ये मूर्ती योग्यरित्या ठेवाव्यात, वाहने बंदिस्त असावीत. बंदिस्त करताना त्यावर नवीन ताडपत्री असावी, विसर्जन पश्चात मुर्तींची वाहतूक करण्यासाठी सुस्थितीतील व चांगली वाहने असावीत, रस्त्यांवर वाहतूक अत्यंत कमी असेल अशा वेळेत ठरवून दिलेल्या मार्गाने विसर्जन पश्चात मुर्तींची वाहतूक करावी, वजन काट्यावर वाहनांची तसेच वजनाची योग्य नोंद करावी. वजन काट्यावर नोंद केली नाही अशा वाहन फेरीसाठी अधिदान करू नये, सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी समर्पित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. छायाचित्र आणि चित्रफीतींसह योग्य तो दस्तावेज दररोज ठेवावा, स्थानिक कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय राखून स्वच्छतेची संपूर्ण कार्यवाही करावी, इत्यादी सविस्तर सूचना देखील या परिपत्रकानुसार करण्यात आल्या आहेत.

संबंधित परिमंडळाचे उपआयुक्त यांच्या देखरेखीखाली, संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त हे सदर कार्यवाही पार पाडणार आहेत. तर, सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) हे दैनंदिन संपूर्ण कार्यवाहीचा लेखाजोखा ठेवणार आहेत.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here