*मंत्री ‘पालकमंत्री’ नव्हे, तर जिल्ह्याचे ‘मालकमंत्री ‘ बनण्याच्या स्पर्धेत आहेत का ?*
*मुख्यमंत्री दावोसला गेले, पण उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले ?*
*सैफ प्रकरणी तत्परता, संतोष देशमुख प्रकरणी दिसत नाही*
दि.:- २० जानेवारी २०२५, मुंबई*
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आ आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मंत्र्यांच्या पालकमंत्री पदावरून होणाऱ्या गोंधळावर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली . तसेच बीड परभणीतील जनता न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले .
*मंत्री ‘पालकमंत्री’ नव्हे, तर जिल्ह्याचे ‘मालकमंत्री’ बनण्याच्या स्पर्धेत आहेत का ?*
राज्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली, मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला स्थगिती देण्यात आलीय . त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की ‘राज्यात नक्की काय चाललंय? मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे . राज्यात पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली आहे . कोणीतरी चेले नाराज होतात, टायर जाळतात आणि स्थगिती दिली जाते . स्थगिती कोणाच्या हट्टपोटी दिली आहे ?
एसटी घोटाळा ज्यांच्या कार्यकाळात झाला आहे त्यांना पालकमंत्री व्हायचं आहे . जे मुख्यमंत्री कोणासमोर झुकत नाही, ते दादागिरी सहन कशी करताय ? जनतेची यामध्ये कितपत सेवा तुम्ही करणार. जे नाराज होतात त्यांचा राजीनामा घ्यायला हवा . मंत्री ‘पालकमंत्री’ नव्हे, तर जिल्ह्याचे ‘मालकामंत्री’ बनण्याच्या स्पर्धेत आहेत का ? असा प्रश्न निर्माण होतोय .
*सैफ प्रकरणी तत्परता, संतोष देशमुख प्रकरणी दिसत नाही*
मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत, मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय . असं म्हणत आदित्य ठाकरे म्हणाले की बीड आणि परभणीची जनता न्यायासाठी आक्रोश करत असताना, ती जनता मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही, वाल्मीक कराड शरण आला . पण सैफ प्रकरणात पोलिसाना मोकळीक दिली तर ते कसे काम करुस शकतात याचा उदाहरण आपण काल पाहिलं, पोलिसांच अभिनंदन . १० वर्ष भाजप सरकार आहे . बांगलादेशी विरोधात मोर्चा काढतात , पण तरी हे घुसखोर बांगलादेशी आले कसे ? आपलं केंद्र सरकार काहीच करू शकत नाही का ? हा आरोपी बांगलादेशी कुठे रहात होता तर ठाणे शहरात . पण त्याला पकडला ही आनंदाची बाब . मात्र सैफ प्रकरणी जी तत्परता दाखवली , ती संतोष देशमुख प्रकरणी दिसत नाही . असं आदित्य ठाकरे म्हणाले .
*मुख्यमंत्री दावोसला गेले, पण ते उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले ?*
मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आहेत .त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की दावोस मधून जर राज्यासाठी काही मोठं येत असेल, तर त्याच स्वागत करू . पण मागील दावोस दौऱ्यात जो खर्च करण्यात आला जी उधळपट्टी झाली ती होऊ नये . अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मुख्यमंत्री दावोस ला गेले पण ते उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले ? आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले ते शोधा असं आदित्य ठाकरे म्हणाले .



















