Home मुंबई पाण्याअभावी विदर्भातील संत्रा-मोसंबीच्या बागा धोक्यात – अनिल देशमुख

पाण्याअभावी विदर्भातील संत्रा-मोसंबीच्या बागा धोक्यात – अनिल देशमुख

7
0

शासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी
मुंबई,प्रतिनीधी
यावर्षी पावसाळा प्रचंड लांबणीवर पडल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा कायम असल्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा आणि मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणावर वाळू लागल्या आहेत. आधीच उन्हाच्या तीव्र झळा आणि आता पावसाने दिलेली ओढ यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे नुकसानग्रस्त बागांचा सर्व्हे करुन राज्य शासनाने या भागात तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना प्रति एकरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी गृहतंत्री अनिल देशमुख यांनी केली.
विदर्भातील संत्रा आणि मोसंबीवर हजारो शेतकरी कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, यंदा पावसाने दगा दिल्यामुळे विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. झाडांना पाणी देणे अशक्य झाल्याने डोळ्यांसमोर हिरवीगार झाडे सुकू लागली आहेत, तर अनेक ठिकाणी झाडे कोमेजून मृत पावत आहेत. वर्षानुवर्षे पोटच्या पोरासारखी वाढवलेली संत्रा-मोसंबीची झाडे पाण्याअभावी जळताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच तीव्र उन्हाने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आणि आता पावसाळा लांबल्याने बागा वाचवणे अशक्य झाले झाल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
संत्र्याची झाडे एकदा वाळली की ती पुन्हा उभी करण्यासाठी शेतकऱ्यांची अनेक वर्षे वाया जातात. हा केवळ या वर्षाच्या पिकाचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. पाण्याअभावी वाळत असलेल्या संत्रा व मोसंबी बागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 रुपये तातडीची मदत देण्यात यावी. जर शासनाने या गंभीर परिस्थितीची वेळीच दखल घेतली नाही आणि विदर्भामधील संत्रा उत्पादकांना तातडीने मदत पोहोचवली नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशाराही अनिल देशमुख यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here