*रेल्वे प्रशासनाकडून महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची माहिती; पडीक इमारती पाडण्यासह सीसीटीव्ही, हायमास्ट व संयुक्त गस्त वाढविण्याचा निर्णय*
*पावसाळी अधिवेशनात या सर्व विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार उच्चस्तरीय बैठक*
मुंबई, दि. १९ जून २०२६ : कल्याण रेल्वे यार्ड परिसरातील महिला सुरक्षा, बालकांचे संरक्षण आणि पडीक इमारतींच्या प्रश्नावर शिवसेना नेत्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सुरू केल्याची माहिती अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) तरुण कुमार यांनी १० जून २०२६ रोजी डॉ. नीलम गोऱ्हे यांना पाठविलेल्या पत्रात कल्याण स्थानक व रेल्वे यार्ड परिसरात महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले आहे.
पत्रानुसार, कल्याण रेल्वे यार्डमधील ३० हून अधिक पडीक व ओसाड इमारती पाडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष पाडकाम सुरू होणार आहे. तसेच मुंबई विभागात सध्या ३,५८८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून आणखी १,६३२ नवीन कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. कल्याण यार्डमध्ये २१ हायमास्ट दिवे आणि स्थानक परिसरात ५ हायमास्ट दिवे बसविण्यात आले असून अंधाऱ्या जागांवर अतिरिक्त प्रकाशयोजना केली जात आहे.
महिला सुरक्षेसाठी संयुक्त गस्त वाढविण्यात आली असून ३४ मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत महिला डब्यांमध्ये महिला आरपीएफ, जीआरपी व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘स्मार्ट सहेली’ आणि ‘मेरी सहेली’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ‘स्मार्ट सहेली’ अंतर्गत ५३ व्हॉट्सॲप गट तयार करण्यात आले असून त्यात २८ हजार ३६६ महिला प्रवासी जोडल्या गेल्या आहेत. तसेच हेल्पलाईन क्रमांक १३९ व १५१२ चोवीस तास सुरू असून महिला डब्यांमध्ये ‘टॉक बॅक सिस्टिम’ आणि पॅनिक बटणाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
याशिवाय, रेल्वे प्रशासनाने १९८ सवयीच्या गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या सर्व विषयांवर पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. रेल्वे प्रशासन, पोलीस, महापालिका आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून कल्याण रेल्वे यार्ड परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या बैठकीत ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


















