Home मुंबई *बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपा महायुती सरकारच जबाबदार, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय...

*बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपा महायुती सरकारच जबाबदार, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या – खासदार वर्षा गायकवाड.*

8
0

*मुंबईची जीवनवाहिनी ठप्प होईपर्यंत सरकार काय झोपले होते का? मुंबईकरांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका..*

मुंबई, दि. १९ जून ..

भाजपा महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट सेवा ठप्प झाली व मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. लाखो मुंबईकर कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले असताना त्यांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. हा केवळ कामगारांचा प्रश्न नाही, तर भाजपा महायुती सरकारच्या निष्क्रियतेचा आणि चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कामगार संघटनांशी सकारात्मक चर्चा करावी व प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन बेस्ट सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पावले उचलावीत असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

बेस्ट संपावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपा महायुती सरकारवर तोफ डागली, त्या पुढे म्हणाल्या की, वर्षानुवर्षे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित ठेवायच्या, कंत्राटीकरण आणि खासगीकरणाला प्राधान्य द्यायचे, कामगारांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि परिस्थिती चिघळल्यानंतर मेस्माचा बडगा उगारायचा हीच भाजपा महायुती सरकारची कार्यपद्धती बनली आहे. कामगार संपावर जाणार याची कल्पना प्रशासनाला आधीपासून होती. मग लाखो मुंबईकरांना वेठीस धरण्याची वेळ येईपर्यंत सरकार झोपले होते का? वेळेत चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी आता न्यायालय आणि कायद्यामागे लपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सरकारची प्राथमिकता नेमकी काय? मुंबईकरांना सेवा देणारी सार्वजनिक व्यवस्था वाचवणे की खासगीकरणाचा अजेंडा राबवणे? बेस्ट सेवा ठप्प होण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली, याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न उपस्थित करून भाजपा महायुती सरकारला मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत काहीही देणेघेणे नाही, फक्त मोठमोठ्या घोषणा करून दिशाभूल केली जाते. सामान्य मुंबईकरांच्या सहनशिलतेचा भाजपा महायुती सरकारने अंत पाहू नये, असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here