Home Trending Now स्वर हरपला, पण नाद शिल्लक आहे* *पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांच्या निधनाने...

स्वर हरपला, पण नाद शिल्लक आहे* *पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमी पोरकी*

44
0

*स्वर हरपला, पण नाद शिल्लक आहे*
*पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमी पोरकी*

मराठी संगीत रंगभूमीचा एक दीपस्तंभ आज मालवला. ‘जय गंगे भागीरथी’ या एकाच नाट्यपदाने तीन पिढ्यांच्या काळजाचा ठाव घेणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते, *हिंदुस्थानी शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचे अध्वर्यू पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचे १७ जून २०२६ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी कारंजाळे, गोवा येथील निवासस्थानी निधन झाले.*

*सांबाप्रसाद रघुवीर सावकार (१४ डिसेंबर १९२८ – १७ जून २०२६) हे केवळ कलाकार नव्हते, तर संगीत नाटकाच्या सुवर्णकाळाचे चालते-बोलते स्मारक होते. गोव्याच्या पारंपरिक संगीत-नाटक घराण्यात जन्मलेल्या सावकारांनी वडील रघुवीर सावकार, श्रीपादराव नेवरेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे गायकीचे धडे घेतले.

*सावकारांचा जन्मच मुळी संगीताच्या आणि नाटकाच्या घराण्यात झाला. सर्व सावकार घराणंच नाटकातलं.‍ ‘संशयकल्लोळ’ मध्ये एकाच वेळी चार भूमिका साकारण्याचा विक्रम असो, की ‘नाट्यनिकेतन’च्या नाटकांतून केलेली वाटचाल. *गोपीनाथ सावकार यांच्या ‘कलामंदिर’ नाट्यसंस्थेत त्यांनी जुनी संगीत नाटके गाजवली. मध्यंतरी प्रभाकर पणशीकरांच्या  नाट्यसंंदा संस्थेतही त्यांनी संगीताचं महत्त्व सांगणारं नाटक केलं – पणशीकरांची नाट्यसंपदा गाजवली.* पण त्यांचे नाव मराठी मनावर कोरले गेले ते *विद्याधर गोखले यांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि गोपीनाथ सावकार यांच्या निर्मिती-दिग्दर्शनातील, छोटा गंधर्व यांच्या संगीताने सजलेल्या ‘सुवर्णतुला’ – या दोन्ही नाटकांमुळे. ही दोन्ही महाकृती एकाच वेळी रंगभूमीवर आली आणि मराठी संगीत नाटकाचा सुवर्णकाळ उजळून निघाला. ‘सुवर्णतुला’ हे नावाप्रमाणेच सोनं होतं.* *संगीत नाटकाबरोबरच आचार्य अत्रे यांचे गाजलेले ‘उद्याचा संसार’ नाटक रंगभूमीवर आणताना शेखरची महत्त्वाची भूमिका प्रसाद सावकार यांनीच साकारली होती.*

*१९६० ते १९८५या काळात त्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली. ५०००हून अधिक लाईव्ह शो केले.* ‘जय जय गौरी शंकर’ या नाटकाचे तर त्यांनी *२५०० हून अधिक प्रयोग* केले. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मानापमान’, ‘संत गोरा कुंभार’ (१९६७ चित्रपट) ही त्यांची गाजलेली नाटके-चित्रपट. *’घेई छंद मकरंद’, ‘उठ पंढरीच्या राया’, ‘मुरलीधर श्याम’, ‘नारायणा रमारमणा’, ‘ऐ गुलबदन’* ही त्यांची अजरामर गीते आजही रसिकांच्या ओठावर आहेत.

*माझी भेट*
*सहा-सात वर्षांपूर्वी दादरला त्यांना भेटले होते. ‘पारिजात’ मध्ये ते उतरलेले असायचे. तिथेच भेट झाली.* वयाच्या नव्वदीतही त्यांच्या आवाजातील तोच भरदारपणा, बोलण्यातील तीच शुद्धता आणि डोळ्यातली तीच चमक. सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे या वयातही ते नाटकाचे प्रयोग करत होते.

*मी संपादन व लेखन केलेले नटश्रेष्ठ  गोपीनाथ सावकार यांच्या व्हिजनरी ‘ पुस्तकात त्यांचा विशेष लेख होता. त्यांनी ते पुस्तक वाचलं होतं. त्याबद्दल ते भरभरून बोलले.* एका तपस्वी कलाकाराने एका लेखकाच्या कामाची दखल घ्यावी, यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता?*बोलताना त्यांचं आत्मचरित्र लिहिण्याबद्दल बोलणं झालं. ‘पंडितराज जगन्नाथ’ च्या आठवणी, विद्याधर गोखले, वसंत देसाई, राम मराठे यांच्यासोबतचा तो सुवर्णकाळ – हे सगळं शब्दबद्ध व्हायला हवं, असं ते म्हणाले. *”मी मुंबईत आलो की भेटू, निवांत बसून बोलू,” असं ठरलं होतं.*

*पण नंतर ते राहिलं.* काळाने घाई केली. एका युगाचा साक्षीदार, एका इतिहासाचा दस्तऐवज – ते’आत्मचरित्र’ माझ्याकडून झाले नाही. ‘पारिजात’च्या त्या खोलीत त्यांनी सांगितलेला मंत्र मात्र आजही कानात घुमतो – ‘कलाकाराने रियाज कधी सोडू नये, प्रयोग कधी थांबवू नये. आणि लेखकाने लिहिणं कधी सोडू नये.’ रंगमंच हेच ज्यांचं आयुष्य, त्यांच्यासाठी वय हा फक्त आकडा होता.

१९६० चे दशक हा मराठी संगीत नाटकाचा पुनर्जन्मकाळ. *’पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ ही दोन्ही नाटके एकाच वेळी रंगभूमीवर आली. ‘सुवर्णतुला’ खरोखरच सोनं होतं – छोटा गंधर्वांचे संगीत, गोपीनाथ सावकारांचे दिग्दर्शन निर्मित आणि प्रसाद सावकारांचा श्रीकृष्ण.* विद्याधर गोखले, वसंत देसाई, राम मराठे, जितेंद्र अभिषेकी ही सगळी मांदियाळी एकत्र आली आणि इतिहास घडला. ‘जय गंगे भागीरथी’ आणि ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे केवळ गाणी नव्हती, तो एका सांस्कृतिक प्रबोधनाचा नाद होता. प्रसाद सावकारांच्या भरदार, शुद्ध आणि करामतीने नटलेल्या आवाजाने त्या नादाला अमरत्व दिले.

आज प्रश्न पडतो, सावकार गेले, त्यांच्याबरोबर संगीत नाटकही संपले का? ‘पंडितराज जगन्नाथ’ नंतर तशी कलाकृती पुन्हा झाली नाही. प्रेक्षक बदलला, माध्यमे बदलली, पण संगीत नाटकाला लागणारा रियाज, साधना आणि समर्पण बदलले. *पण सावकारांनी नव्वदीतही रंगमंच सोडला नाही. ‘पारिजात’मधून ते प्रयोगाला जायचे. ५,०००हून अधिक लाईव्ह शो करणारा, २,५००० वेळा ‘जय जय गौरी शंकर’ गाजवणारा कलाकार वयाने थकत नाही.*

*२००६ मध्ये राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला पद्मश्री*, बालगंधर्व सुवर्णपदक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार – हे सगळे सन्मान सावकारांना मिळाले. पण खरा सन्मान रसिकांच्या मनात आहे. आजही ‘घेई छंद मकरंद’, ‘उठ पंढरीच्या राया’ लागले की जाणकार रसिक डोळे मिटून घेतो.

*पंडित प्रसाद सावकार १८ जून २०२६ रोजी पंचतत्त्वात विलीन होतील.* पण कलाकार मरत नाही. तो आपल्या कलाकृतीतून जिवंत राहतो. जोपर्यंत ‘जय गंगे भागीरथी’ आकाशवाणीवर वाजत राहील, तोपर्यंत प्रसाद सावकार अमर राहतील.

मराठी संगीत रंगभूमी आज पोरकी झाली, पण तिच्या ओंजळीत सावकारांनी दिलेला नाद शिल्लक आहे. *आणि त्या नादासोबत त्यांची शिकवणही – रियाज सोडू नका, रंगमंच सोडू नका, लिहिणं सोडू नका. आणि शक्य असेल तेव्हा भेटी टाळू नका, कारण ‘नंतर’ कधीच येत नाही. ‘कलामंदिर’ ते ‘नाट्यसंंदा’, संगीताचं महत्त्व सांगणाऱ्यापासून ‘उद्याचा संसार’पर्यंत, छोटा गंधर्व ते विद्याधर गोखले – ५००० प्रयोग करणाऱ्याचा, सोन्यासारखी ‘सुवर्णतुला’ देणाऱ्याचा वारसा जपला पाहिजे. प्रसाद सावकार  यांनाभावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांति.

फोटो* – राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या हस्ते पद्मश्री स्वीकारताना
*. कॅप्शन* – _”२००६: भारतरत्नांच्या हस्ते पद्मश्री स्वीकारताना पद्मश्री. विज्ञानाचा राष्ट्रपती आणि नाट्यसंगीताचा सम्राट – दोन तपस्वी एका चौकटीत.”_
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here