Home Uncategorized *छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांतून मिळते लढण्याचे बळ – विकास खारगे

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांतून मिळते लढण्याचे बळ – विकास खारगे

63
0

*युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेल्या १२ किल्ल्यांवर आधारित चित्रकला स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २३ शाळांमधील ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेत युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात*

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले स्वराज्य हे संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. हे स्वराज्य अबाधित रहावे यासाठी महाराजांनी गड-किल्ले उभारले. हे किल्ले शिवरायांच्या शौर्याचे प्रतिक आहेत. या गड-किल्ल्यांतून येणाऱ्या पिढीला प्रेरणा, आत्मविश्वास आणि लढण्याचे बळ मिळते,” असे मनोगत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्या अनुषंगाने युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा दि २७ जुलै १ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये मुंबई येथे शासकीय दौऱ्यावर आहेत. या किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना त्यांची माहिती व्हावी यानिमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २३ शाळांमध्ये १२ किल्ल्यांच्या संदर्भात बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. वरळी येथील वरळी सी फेस शाळेतही ही चित्रकला स्पर्धा पार पडली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विकास खारगे बोलत होते.

यावेळी युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा, पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे आदींसह सर्व उपशिक्षणाधिकारी, शिक्षण, विद्यार्थी उपस्थित होते.

विकास खारगे म्हणाले,” किल्ले शिवनेरी, साल्हेर, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी अशा भारतातील १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. जगभरातील पर्यटक आता छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अनुभवायला येतील. किल्ल्यांचे महत्त्व समजून घेतील. या किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीला समजायला हवा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून किल्ल्यांवर आधारित ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये सृजनशीलता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २३ शाळांमध्ये हा उपक्रम राबवून या मोहिमेला बळ दिले आहे. ”

युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून किल्ल्यांबाबत सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले. तसेच त्यांनी उपस्थित शिक्षकांकडून किल्ल्यांबाबत माहिती जाणून घेतली. शिक्षकांनी देखील आपले अनुभव कथन केले.

उप आयुक्त शिक्षण डॉ. प्राची जांभेकर यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागातील एका शाळेत ही स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. प्रत्येक शाळेतील २०० असे एकूण ५ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. तसेच काही शिक्षकांनी साकारलेल्या चित्रांचेही यावेळी वरळी सी फेस शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले होते. याबाबतही डॉ. जाभेकर यांनी प्रमुख पाहुण्यांना माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा, पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरळी सी फेस शाळेची पाहणी केली. शाळेतील विविध उपक्रम, विविध दालनांना त्यांनी भेट दिली. संगीत विभागाला भेट दिली असता तेथे विकास खारगे यांनी स्वत: बासरीवर ‘सारे जहाँ से अच्छा…’ या गिताची धून वाजवून दाखविली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here