Home मनोरंजन जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्त साहित्यवाचन

जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्त साहित्यवाचन

306
0

जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्त साहित्यवाचन
प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या साहित्यवाचनाचा एक कार्यक्रम दिनांक १५ मार्च २०२५ रोजी मुलुंडमध्ये आयोजण्यात आला होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभाग आणि भंडारी सहायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी सहायक मंडळ सभागृह येथे हा कार्यक्रम साजरा झाला.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड शाखेचे अध्यक्ष श्री. शं. रा. पेंडसे यांच्या हस्ते जयवंत दळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्रीमती रजनी साळुंखे यांनी दळवी यांच्या काही कथांचा थोडक्यात परामर्श घेतला. शुभांगी सिनकर यांनी ‘भिडस्त माणसा ची कथा’ पेश केली. श्री. लक्ष्मण उपाध्ये यांनी ‘वेडगळ’ या कादंबरीचा परिचय करून दिला. तर वैशाली अभ्यंकर यांनी ‘एल्सी’ या कथेचे अभिवचन केले. श्रद्धा जोगळेकर यांनी दळवी यांच्या ‘आत्मचरित्राऐवजी’ या आत्मचरित्रातल्या काही भागाचे वाचन केले. ‘परममित्र’ या पुस्तकातील वि. स. खांडेकर यांचे व्यक्तीचित्र वैशाली सरवणकर यांनी उलगडले; तर मधुर महंत यांनी दळवींच्या सारे प्रवासी घडीचे’ या कादंबरीचा खुसखुशीत परिचय करून दिला. भगवान आडगावकर यांनी ‘स्वप्नरेखा’ ही कथा वाचली. ‘अधांतरी’ या कादंबरीचे मर्म नीलिमा देशपांडे यांनी अचूक उलगडून दाखवले. तर ‘संध्याछाया’ या नाटकातील अतिशय ह्दयंगम प्रवेश युगंधरा वळसंगकर आणि कल्पना कुलकर्णी यांनी सादर केला.
कार्यक्रमाची सांगता डॉ. भारती निरगुडकर यांच्या भाषणाने झाली. दळवी यांच्या महत्त्वाच्या, आशयघन अशा कादंबऱ्या आणि नाटकांचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि मर्मग्राही असे विवेचन त्यांनी केले. त्यांच्या अतिशय सोप्या तरीही रसाळ भाषेने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगंधरा वळसंगकर यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी केले. सहकार्यवाह श्री. महेश कवटकर, सभासद अवंती महाजन आणि वसंत गोळे तसेच ग्रंथालयाच्या सेवकवर्गाने कार्यक्रमाच्या नियोजनासाठी खूप कष्ट घेतले. त्यामुळे थोडासा लांबलेला हा कार्यक्रम अतिशय रंगतदार आणि अभिनव असा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here